अजित पवारांचा विश्वासू शिलेदार साथ सोडणार?; विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2024 12:53 PM2024-07-02T12:53:44+5:302024-07-02T12:54:46+5:30

लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या अपयशानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीत अनेक आमदार परतीच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे.

I will contest the assembly election 100%, I will tell later what the symbol will be, reaction of Nana Kate of Ajit Pawar NCP group | अजित पवारांचा विश्वासू शिलेदार साथ सोडणार?; विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्धार

अजित पवारांचा विश्वासू शिलेदार साथ सोडणार?; विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्धार

पिंपरी चिंचवड - आगामी काळात चिंचवड विधानसभेचे तिकीट महायुतीकडून भाजपाला गेले तरी मी इथं निवडणूक लढणार आहे असं ठाम मत अजित पवार समर्थक नाना काटे यांनी केल्यानं चर्चांना उधाण आलं आहे. नाना काटे हे पिंपरी चिंचवडमधील अजित पवारांचे समर्थक म्हणून ओळखले जातात. गेल्यावेळी झालेल्या पोटनिवडणुकीत नाना काटे हे राष्ट्रवादीकडून विधानसभेच्या रिंगणात उतरले. त्यावेळी भाजपाच्या अश्विनी जगताप यांच्याकडून त्यांना पराभव सहन करावा लागला. मात्र आता येत्या निवडणुकीत पुन्हा उभं राहणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. 

नाना काटे म्हणाले की, मी चिंचवड विधानसभेच्या अनुषगांने अजितदादांची काही दिवसांपूर्वी भेट घेतली होती. मी चिंचवडमध्ये काम करतोय. लोकांच्या भेटीगाठी करतोय. तू तुझं काम सुरू ठेव, बाकीचे काय असेल ते पुढे बघू असं दादांनी मला सांगितले आहे. मी निवडणुकीला १०० टक्के सामोरे जाणार आहे. चिन्ह काय असेल ते त्यावेळी ठरवू. आता काही सांगू शकत नाही. सध्या मी कुठलाही निर्णय घेतला नाही असं त्यांनी स्पष्ट केले. 

तसेच हा मतदारसंघ भाजपाला जाईल याची गॅरंटी नाही. भाजपामध्ये इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. ही संख्या पाहता आणि जगतापांमध्येही २ जण इच्छुक आहेत. त्यामुळे हा वाद राष्ट्रवादीला जागा सोडून सुटू शकतो. त्यामुळे आता लगेच कुठलेही विधान करणे योग्य नाही. मी चिन्हावर निवडणूक लढणार पण ते चिन्ह कुठले असणार हे विधानसभेला दिसेल असंही नाना काटे यांनी म्हटलं आहे. 

अनेकजण घरवापसीच्या तयारीत...

नुकतेच अजित पवार गटाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह १६ नगरसेवकांनी मोदी बागेत शरद पवारांची भेट घेतली. माजी आमदार विलास लांडे हेदेखील शरद पवार गटात परतण्याची शक्यता आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा फटका बसू शकतो. शरद पवारांच्या भेटीनंतर अजित गव्हाणे म्हणाले की, मी भोसरी विधानसभेची निवडणूक लढणार आहे. शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन घेण्यासाठी माझ्या सहकाऱ्यांना घेऊन गेलो होतो त्यांनी शुभेच्छा दिल्या असं त्यांनी सांगितले. 

Web Title: I will contest the assembly election 100%, I will tell later what the symbol will be, reaction of Nana Kate of Ajit Pawar NCP group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.