लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : संजय राऊत यांना अटकेचे निर्देश द्या, अशी मागणी विधान परिषदेत सत्ताधारी सदस्यांकडून उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडे करण्यात आली. यावर राऊत हे खासदार आहेत. त्यांच्या अटकेचे आदेश देणे माझ्या अधिकारांनुसार संयुक्तिक ठरत नाही. ते अधिकार गृहमंत्र्यांना आहेत, पण मला जर अधिकार दिले तर कुणाला अटक करायची हे मी ठरवेन, अशी समज देतानाच हक्कभंग तपासण्यासाठी एक दिवसाचा कालावधी लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
राऊत यांच्याविरोधात हक्कभंग आणला तर मग विरोधकांना देशद्रोही म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांविरोधातही आम्ही हक्कभंग आणू, असा इशारा अनिल परब यांनी दिला.
उद्धव ठाकरेंनाही चोर ठरवणार का - फडणवीस nविधिमंडळाला चोरमंडळ संबोधले जात असेल तर चोरमंडळात काम करण्यापेक्षा घरी गेलेले बरे. कशाकरिता चोरमंडळात काम करता? हा सत्तापक्षावर आरोप नाही, विधिमंडळावर आरोप आहे. nकुणी कुणाला राष्ट्रद्रोही, देशद्रोही म्हणणेही अयोग्य, पण राऊत यांचे विधान सहन करण्यासारखे नाही. मग कुणीही उठेल आणि काहीही बोलेल.n म्हणूनच हक्कभंगाची तरतूद आहे. उद्धव ठाकरेसुद्धा या सदनाचे सदस्य आहेत, मग राऊत त्यांनाही चोर ठरवणार आहेत का? असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
संजय राऊत यांनी कशासंदर्भात विधान केले हे तपासून घेणे आवश्यक आहे. आम्ही त्यांच्या वक्तव्याचे समर्थन केलेले नाही. - अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते, विधान परिषद
संजय राऊत यांच्या विधानाचे आम्ही समर्थन करत नाही. मात्र, त्यासाठी सभागृह तहकूब करायची गरज नाही. दररोज तहकूब करायचे तर आठ दिवस सुट्टी जाहीर करा. - एकनाथ खडसे, आमदार, राष्ट्रवादी