सांगली : मराठा, पाटीदारांसह अन्य विविध समाजाला आरक्षण देऊन आरक्षणाचा कोटा ७५ टक्क्यांपर्यंत नेण्यास सरकारमधील काहींचा विरोध आहे. तरीही पंतप्रधानांसमोर ही गोष्ट मांडून माझ्या कालावधीत आरक्षणाचा कोटा वाढविणारच, असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले.आठवले म्हणाले, ‘अनेक राज्यांमध्ये आता विविध समाजघटकांकडून आरक्षणाची मागणी होत आहे. या सर्वांना सामावून घेण्यासाठी राज्य शासनाने निर्णय घेऊन काहीच उपयोग होणार नाही. न्यायालयातसुद्धा आरक्षणाचे हे निर्णय टिकणार नाहीत. कारण कायद्यातील तरतुदीनुसार आरक्षणाचा कोटा ५0 टक्क्यांवर जाऊ देता येत नाही. त्यामुळेच संसदेत यासंदर्भातील ठराव करण्याची गरज आहे. कायद्यात बदल करून आरक्षणाचा कोटा ५0वरून ७५ टक्क्यांपर्यंत नेण्याचा माझा विचार आहे. याबाबत सत्ताधारी पक्षाच्या बैठकीत हा विषय मी उपस्थित केला होता. काहींचा या प्रस्तावाला विरोध आहे. बाकींचा कसाही विचार असला तरी, मी पदावर असेपर्यंत आरक्षणाचा हा विषय मार्गी लावणार.’मराठा समाजात सगळेच श्रीमंत नाहीत. या समाजातील गरिबीही मी पाहिली आहे. त्यामुळे त्यांना आरक्षण मिळावे, असे माझे ठाम मत आहे, याचा पुनरुच्चारही आठवलेंनी केला.अॅट्रोसिटीचा गैरवापर नकोविदर्भ आणि मराठवाड्याच्या तुलनेत पश्चिम महाराष्टÑात दलितांवरील अत्याचाराचे प्रमाण कमी आहे. सांगली जिल्ह्यात वर्षभरात अॅट्रॉसिटीच्या ३३ गुन्ह्यांची नोंद झाली. हा कायदा सामाजिक एकोपा टिकावा म्हणूनच झाला आहे. त्यामुळे याचा गैरवापर करण्याचा प्रयत्न मागासवर्गीय लोकांनी करू नये.- रामदास आठवले, राज्यमंत्री, सामाजिक न्याय, भारत सरकार
मी आरक्षण कोटा वाढविणारच - आठवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2017 4:55 AM