पंढरपूर : पंढरपुरात आयोजित मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. यावेळी ५० आमदारांनी विश्वास दाखवणं ही साधी गोष्ट नाही. ही एक ऐतिहासिक घटना आहे. या घटनेचे जगातील ३३ देशांनी कौतुक केले आहे. आमदारांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. गरज पडल्यास टोकाचे पाऊल उचलेन, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. या मेळाव्याला शिवसेनेचे बंडखोर आमदार तानाजी सावंत यांच्यासह अनेक शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, "हा मेळावा एकनाथ शिंदे गटाचा नाही तर बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा आहे. आज केवळ आंनद दिघे यांच्या आशीर्वादाने इथे उभा आहे. धर्मवीरमध्ये सगळा प्रसंग दाखवता आला नाही. गेल्या वीस ते 22 वर्ष झाले माझ्या आयुष्यात खूप कठीण प्रसंग आले. पण मी डगमगलो नाही. आताही डगमगणार नाही. मी जास्त बोलत नाही. तसेच, टीकाकारांना कामातून उत्तर देईन."
याचबरोबर, मी कमी बोलतो आणि जास्त एकतो. सभागृहात देखील मी कमी बोललो. पण वेळ आल्यावर सर्वकाही सांगेन. माझ्यावर ५० आमदारांनी विश्वास दाखवणे, ही साधी गोष्ट नाही. ही एक ऐतिहासिक घटना आहे. या घटनेचे जगातील ३३ देशांनी कौतुक केले आहे. आमदारांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. गरज पडल्यास टोकाचे पाऊल उचलेन, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. दरम्यान, मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी एकनाथ शिंदे यांना थोडा उशिर झाला. त्यामुळे त्यांनी दिलगिरी व्यक्त करत ऑपरेशन मोडमध्ये गेल्यानंतर असाच उशीर होतोय, अशी टिप्पणी केली. यावेळी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
सर्वांना चांगले दिवस येऊ द्या - मुख्यमंत्रीआषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आज पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या हस्ते शासकीय पूजा संपन्न झाली, त्यानंतर त्यांनी पत्रकारांची संवाद साधला. यावेळी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांला आषाढी एकादशीच्या पूजेचा मान मिळाला, हा माझ्या आयुष्यातील महत्त्वाचा दिवस आहे. माझे वडील या ठिकाणी होते, माझा मुलगाही या ठिकाणी होता आणि नातूही, हे भाग्य सर्वांनाच मिळाले पाहिजे. पांडुरंगाला सर्वकाही माहीत असते. पाऊस उशिरा सुरू झाला आहे, पण चांगला सुरू झाला आहे. कुठेही अतिवृष्टी होऊ नये, बळीराजा सुखावला पाहिजे, चांगला पाऊस होऊ द्या, बळीराजा आपला मायबाप आहे. सर्व संकट दूर होऊ द्या, कोरोनाचा नायनाट होऊ द्या, सर्वांना चांगले दिवस येऊ द्या, असे साकडे मी पांडुरंगाकडे घातलंे आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.