NCP Ajit Pawar ( Marathi News ) : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांच्यात चांगलीच जुगलबंदी रंगत आहेत. अजित पवार यांनी फलटणमध्ये केलेल्या एका वक्तव्याचा आधार घेत शरद पवार यांनी टोला लगावल्यानंतर आता अजित पवारांनीही त्यावर मिश्किल टिपण्णी केली आहे.
"रामराजेंना मी आमदार केल्याचं सांगितल्यानंतर ते पवारसाहेबांना खटकलं. त्यानंतर ते म्हणाले की, हा उद्या म्हणेल बारामतीचाही आमदार मीच केला. पण मी तसं म्हणणार नाही. मी इतका वेडा नाही. पवारसाहेब आमदार झाले तेव्हा मी तिसरीत होतो. मग तिसरीतील कार्ट कसं कोणाला आमदार करेन," असं अजित पवार यांनी एका प्रचारसभेत बोलताना म्हटलं आहे.
शरद पवार नक्की काय म्हणाले होते?
"साखरवाडी येथील सभेत राज्याचे एक मंत्री आले होते. त्यांनी रामराजे यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, रामराजे यांना मी तिकीट दिले. खरं तर गंमतच आहे. पक्षाचा अध्यक्ष मी असताना यांनी कसे तिकीट दिले. त्यांना स्वत:ला पहिलं तिकीट मी दिलं होतं. मंत्रिमंडळातही आम्ही घेतलं. आमचे नशीब चांगले म्हणून ते म्हणाले नाहीत पवार साहेबांनादेखील आम्हीच तिकीट दिले,’ अशी खिल्ली उडवत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाव न घेता अजित पवार यांचा समाचार घेतला होता.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपत असताना आज बारामतीत शरद पवार आणि अजित पवार हे सांगता सभेच्या निमित्ताने आमने-सामने असणार आहेत. या सभांमध्ये एकमेकांवर नक्की काय टीका-टिपण्णी केली जाते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.