मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील अंतर्गत संघर्ष आणि महाविकास आघाडीमध्ये होणारी घुसमट यामुळे बंडखोरी केली. आमदारांना घेऊन ते सूरतला गेले. त्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी कारभार करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अखेरीस शिवसेनेचे सुमारे ५० आमदार आणि काही अपक्ष आमदार यांच्या साथीने शिंदे गटाने भाजपासोबत महाराष्ट्रात सत्तास्थापना केली. या सर्व आमदारांना भाजपाकडून प्रत्येकी ५० कोटी रूपये देण्यात आला आरोप विरोधक सातत्याने करत आहेत. विरोधकांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर उभे राहून घोषणाबाजी केली आहे.
"खाऊन खाऊन पन्नास खोके, माजलेत बोके माजलेत बोके..." अशा घोषणा देत विरोधकांनी शिंदे गटाला टोला लगावला. यावर शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak kesarkar) यांनी उत्तर दिलं आहे. ५० खोके काय ५० रुपये जरी घेतले असतील तर राजीनामा देईल असं केसरकर यांनी म्हटलं आहे. "सत्तेसाठी कोणी काही करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. पायऱ्यांवर बसून आंदोलन करतात, घोषणा देतात. तो मुद्दा मी विधान परिषदेत खोडून काढला."
"५० खोकेचा अर्थ ५० कोटी असा असतो. त्यांना मी सांगितलं साधे ५० रुपये जरी मी घेतलेले दाखवलेत तरी माझ्या पदाचा राजीनामा देईन. आम्ही मनापासून काम करणारे कार्यकर्ते असतो. म्हणून मी आव्हान केलं की ५० किंवा ५० हजार घेतलेलं सिद्ध करून दाखवा मी राजीनामा देतो. मी ५० आमदारांचं नेतृत्व करतो. आम्ही सरकार म्हणून जनतेतून निवडून येतो. जर त्यांचे प्रश्न पूर्ण केले जात नसतील तर उठाव होतो. आम्ही प्रामाणिक आहोत म्हणूनच उघडपणे हे सर्व बोलू शकतो" असं दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. माध्यमांना प्रतिक्रिया देताना त्यांनी असं म्हटलं आहे.
जोरदार राडा! शिंदे गट-राष्ट्रवादीचे आमदार भिडले; अमोल मिटकरींनी सांगितले नेमके काय घडले?
शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे आणि राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी एकमेकांना भिडले. यावेळी दोन्ही गटात जोरदार धक्काबुक्कीही झाली. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार, प्रताप सरनाईक, शहाजी बापू पाटील यांनी मध्यस्थी करून दोन्ही गटांना बाजुला करण्याचा प्रयत्न केला. यानंतर मिटकरी यांनी शिवसेनेच्या आमदारांवर गंभीर आरोप केला. शिवसेनेच्या महेश शिंदे यांनी धक्काबुक्की केली, घाणेरडी शिवीगाळ केली, असे ते म्हणाले. तसेच यानंतर मिटकरींनी शिंदे यांची तक्रार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.
शिंदे गटाच्या आमदारांनी शिवीगाळ केली, धक्काबुक्की केली. यामुळे विधीमंडळाच्या पायऱ्यांवर गोंधळ उडाला. अखेर अजित पवार आले आणि आम्हाला बाजुला होऊया म्हणाले. त्यामुळे आम्ही बाजुला झालो असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे. तसेच पन्नास खोके एकदम ओके हा नारा दिल्याने शिंदे गटातील आमदारांना झोंबल्याने त्यानी हे कृत्य केले आहे. आम्ही त्यांना डिवचले नाही त्यांनीच आम्हाला डिवचले आहे. धक्काबुक्की करणारे आमदार कोण होते त्यांना मी ओळखत नाही. आम्हाला अजितदादा पवार यांनी सभागृहाच्या पायऱ्यांवर बोलावले होते त्यानुसार आम्ही आंदोलनासाठी आलो होते. परंतु जे काही अशोभनीय वर्तन केले आहे ते संविधानाला धरून नाही असं मिटकरींनी म्हटलं आहे.