मुंबई : ‘मविआ सरकारच्या काळात गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीसला आत घाला, ही चर्चा माझ्यासमोर झाली. महाजन यांना तर मोक्का लावण्याची तयारी केली होती. त्याचा मी साक्षीदार आहे; पण त्यावेळी मी काय म्हणालो, हे आज सांगणार नाही, पुढे योग्य वेळी सांगेन,’ असाही खुलासा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी केला.
आम्ही चहापानाला गेलो तर महाराष्ट्रद्रोह झाला असता, या विरोधकांच्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. विरोधकांच्या पत्रकार परिषदेतून त्यांची मानसिकता दिसून आली. मला त्यांना सांगायचे आहे की, दाऊदची बहीण हसिना पारकरला ज्यांनी चेक दिला, त्यांच्या मंत्र्यांनी राष्ट्रद्रोह केला, तरीही त्यांचा राजीनामा अजित पवार यांनी घेतला नाही. बरे झाले, अशा राष्ट्रद्रोह्यांसोबत चहा पिण्याची वेळ टळली, असा टोला त्यांनी लगावला.
अजित पवारांनी काय टीका केलेली...
राज्यातील शेतकरी संकटात आहे. शेतमालाला भाव नाही. विकासकामांमध्ये राजकारण होत असल्याने विकासाच्या प्रक्रियेला फटका बसला आहे. जिल्हा नियोजनाचा निधी खर्च न झाल्याने ग्रामीण भागातील कामे रखडली आहेत. महाराष्ट्राचा अभिमान, स्वाभिमान, हित जपण्यात गेल्या आठ महिन्यांत हे सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चहापानाचे निमंत्रण दिले असले तरी या चहापानाला उपस्थित राहणे हा महाराष्ट्रद्रोह ठरेल, असा आरोप करीत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विरोधकांकडून चहापानावर बहिष्कार टाकण्यात आल्याचे जाहीर केले. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नेतृत्वात विरोधकांची विधानभवनात बैठक पार पडली. त्यानंतर विराेधकांची संयुक्त पत्रपरिषद झाली.