पनवेल : डॉ. सुजय विखेंच्याभाजपा प्रवेशाने काहीही फरक पडणार नाही. अनेक नेते पक्षामध्ये ये-जा करीत असतात. एक व्यक्ती महत्त्वाची नाही, तर त्याच्या मागे जनाधार महत्त्वाचा आहे. सुजय विखेने स्वत:च्या आईबाबांचे ऐकले नाही, तर जनतेचे काय ऐकणार? असा टोला अजित पवार यांनी सुजय विखेंना लगावला. बुधवारी पनवेलमधील ज्येष्ठ नागरिक सभागृहात शेकाप पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.देशाच्या संरक्षण खात्याचा कारभार चालणाऱ्या संरक्षण मंत्रालयात पावलापावलावर चोख बंदोबस्त असतो. मी खासदार असताना या मंत्रालयाला स्वत: भेट दिली आहे, तेव्हा त्या ठिकाणचा बंदोबस्त पाहून राफेलची फाइल चोरी होतेच कशी, असा प्रश्न माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित केला. मावळ लोकसभा मतदारसंघातून अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार निवडणूक लढविणार आहेत. पक्षाने अधिकृतरीत्या त्यांच्या नावाची घोषणा केली नसली, तरी पवार कुटुंबीयांच्या वारंवार पनवेल भेटीने हे सिद्ध झाले.मावळ लोकसभा मतदारसंघात सहा मतदारसंघांचा समावेश आहे. पनवेल विधानसभा मतदारसंघ हा या सहापैकी सर्वांत मोठा असल्याने पार्थ पवार यांनीही पनवेलमधील शेकाप-काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेण्यास सुरुवात केली आहे. मागील आठवडाभरापासून पार्थ पवार पनवेलमध्ये मुक्काम ठोकून आहेत. लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत पनवेलमधील राष्ट्रवादीच्या उमेदवाराला आघाडी मिळवून देण्यासाठी शेकापची भूमिका महत्त्वाची असणार आहे. त्यादृष्टीने अजित पवार यांनी उपस्थित शेकाप पदाधिकाºयांना कानमंत्र दिला. समोरील प्रतिस्पर्ध्याला कधीही कमी लेखू नका. विरोधकांचा पराभव करण्यासाठी जिद्दीने कामाला लागण्याची सूचना त्यांनी केली.शेकाप नेते व पवार कुटुंबीयांचे संबंध अतिशय जिव्हाळ्याचे आहेत. शेकाप व राष्ट्रवादीची विचारधारा एकच आहे. नोटाबंदीच्या काळात पैसे असताना अनेकांना त्याचा वापर करता आला नाही. रांगेत उभे राहून अनेकांना प्राण गमवावा लागला. जे सरकार महत्त्वाच्या फायलींचे संरक्षण करू शकत नाही, ते सर्वसामान्यांचे काय संरक्षण करेल? ही बाब सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे, असेही या वेळी पवार यांनी सांगितले. या मेळाव्याला कोकण शिक्षण मतदारसंघातील आमदार बाळाराम पाटील, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, राष्ट्रवादीचे प्रशांत पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सतीश पाटील, नगरसेवक हरेश केणी आदी उपस्थित होते.'भाजपाचे अपयश जनतेसमोर आणा'मागील आठवडाभरापासून पार्थ पवार शेकाप पदाधिकाºयांच्या भेटी घेत असल्याने पनवेलमधील काँग्रेसच्या गोटात नाराजी पसरल्याचे वृत्त होते. अजित पवार यांनादेखील यासंदर्भात चाहूल लागताच त्यांनी पनवेलमध्ये दाखल झाल्यानंतर काँग्रेस भवन गाठले. सुमारे दीड तास काँग्रेस पदाधिकाºयांना मार्गदर्शन करीत प्रचारात भाजपाचे अपयश जनतेसमोर आणा, असे सुचविले. या वेळी जिल्हाध्यक्ष आर. सी. घरत, महेंद्र घरत, सुदाम पाटील आदींसह शेकडो पदाधिकारी उपस्थित होते.
आईबाबांचे ऐकले नाही, तर जनतेचे काय ऐकणार? अजित पवारांचा सुजय विखेंना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2019 5:45 AM