मुंबई : लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे तरुणांसाठी २२ जानेवारीला सकाळी ९ ते दुपारी १ यादरम्यान मोफत आयएएस व आयपीएस प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. येथील हनुमान मंगल कार्यालय येथे हे शिबिर पार पडणार आहे.या शिबिराचे उद्घाटन राज्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलीस महासंचालक विवेक फणसाळकर यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी सनदी अधिकारी होण्याच्या दृष्टीने ते विद्यार्थ्यांसमोर आपले विचार मांडतील. तर मुंबई शहराच्या जिल्हाधिकारी आणि कार्यकारी दंडाधिकारी डॉ. अश्विनी जोशी या ‘प्रशासकीय सेवा : आव्हान आणि संधी’ या विषयावर मार्गदर्शन करतील. त्यात त्या प्रशासकीय सेवेच्या माध्यमातून एका सनदी अधिकाऱ्याला समाजाच्या उत्कर्षासाठी कशा प्रकारे कामाचे आव्हान असते, यावर मनोगत व्यक्त करतील. याशिवाय केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) परीक्षेसंदर्भात ‘यूपीएससी परीक्षेची संपूर्ण तयारी आणि यशाचा गुरुमंत्र’ या विषयावर स्पर्धा परीक्षा तज्ज्ञ अतुल लांडे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील.या मान्यवरांशिवाय सीमा शुल्क विभागाच्या उपायुक्त अनुश्री हर्डीकर-आराधी या ‘यूपीएससी परीक्षेच्या प्रभावी मुलाखतीचे कौशल्य तंत्र’ या विषयावर आपले विचार मांडतील. दरम्यान, यूपीएससी परीक्षेत यश संपादन केलेला मंडळाचा विद्यार्थी अमित चौगुले याचा सत्कारही या वेळी केला जाईल. शिबिराच्या समारोपप्रसंगी तेलंगणा राज्यातील सायराबाद शहराचे मराठमोळे पोलीस आयुक्त महेश भागवत हे पोलीस प्रशासकीय सेवेबद्दल माहिती देणार आहेत. ‘स्वप्न सनदी अधिकारी होण्याचे’ या विषयावर ते विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करतील. (प्रतिनिधी)>...येथे करा नोंदणी!प्रशिक्षण शिबिर विनामूल्य असून, मर्यादित विद्यार्थ्यांनाच या शिबिरात सामील होता येईल, असे आवाहन मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी यांनी केले आहे. शिवाय नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाईल. त्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी सोमवार, १६ जानेवारी व मंगळवार, १७ जानेवारी या दोन दिवसांत सकाळी १० ते रात्री ८ वाजेदरम्यान ‘लालबागचा राजा प्रबोधिनी’, पेरू चाळ कम्पाउंड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, लालबाग येथे प्रत्यक्ष येऊन नाव नोंदविणे गरजेचे आहे. सर्व विद्यार्थ्यांसाठी मंडळाने लेखन साहित्य व चहापानाची मोफत व्यवस्था केली आहे.
तरुणांसाठी आयएएस, आयपीएस प्रशिक्षण शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2017 2:15 AM