मुंबई : पालघर जिल्हा आश्रमशाळेतील मुख्य अधीक्षकाकडून (रेक्टर) १२ लाखांची लाच घेतल्याप्रकरणी आदिवासी विकास विभागाचे अतिरिक्त आयुक्त मिलिंद भगवान गवादे (५४) व उपआयुक्त किरण माळी (३९) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) शनिवारी सायंकाळी अटक केली. एसीबीकडून आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्यावर कारवाई होण्याची गेल्या सहा वर्षांतील ही पहिली घटना आहे.ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील कार्यालयात आंब्याच्या पेटीतून ही रक्कम स्वीकारताना पथकाने त्यांना पकडले. पालघर जिल्ह्यातील १२ आश्रमशाळांमधील अधीक्षकांना काही महिन्यांपूर्वी ‘रेक्टर’ म्हणून पदोन्नती मिळाली आहे. मिलिंद गवादे याने त्या सर्वांकडे प्रत्येकी एक लाख याप्रमाणे १२ लाख रुपये मागितले होते. पैशाची पूर्तता न केल्यास त्यांची पदोन्नती शैक्षणिक पात्रतेच्या आधारावर रद्द करून पुन्हा अधीक्षक या पदावर नेमणूक करू, असे धमकाविले होते. यासंदर्भात आलेल्या तक्रारीच्या आधारे एसीबीने सापळा रचून गवादे व किरण माळी यांना अटक केली. (प्रतिनिधी)
आयएएस अधिकाऱ्यासह दोघे अटकेत
By admin | Published: April 16, 2017 4:44 AM