Sanjeev Hans IAS News: ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाने ३ डिसेंबर रोजी पाच राज्यातील १३ ठिकाणांवर एकाच वेळी धाडी टाकल्या. दिल्ली, गुडगाव, कोलकाता, जयपूर आणि नागपूर शहरात मनी लॉड्रिंग प्रकरणात ईडीने ही कारवाई केली. बिहारमधील आयएएस अधिकारी संजीव हंस आणि इतर व्यक्तींविरोधात ही छापेमारी करण्यात आली आहे. आयएएस अधिकारी संजीव हंस आणि त्यांचे सहकारी, रिअल इस्टेट आणि सेवा क्षेत्रातील इतर व्यक्तींच्या मालमत्तांवर धाडी टाकण्यात आल्या.
आयएएस संजीव हंस मनी लॉड्रिंग प्रकरण काय आहे?
ईडीने केलेल्या तपासात असे समोर आले आहे की, आयएएस अधिकारी असलेल्या संजीव हंस यांनी बिहार प्रशासनात विविध पदांवर कार्यरत असताना भ्रष्टाचाराच्या माध्यमातून पैसे कमावले. गुलाब यादव आणि इतर सहकाऱ्यांनी यात संजीव हंस यांची मदत केली. भ्रष्टाचाराच्या मार्गाने मिळवलेला काळा पैसा पांढरा करून देण्यात या लोकांनी आयएएस संजीव हंस यांची मदत केली. याच प्रकरणात आता ईडीने कारवाई सुरू केली असून, ३ डिसेंबर रोजी १३ ठिकाणी छापेमारी केली.
६० कोटी रुपयांची माहिती आली समोर
संजीव हंस यांच्या एका जवळच्या सहकाऱ्याच्या (जो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे) कुटुंबातील एका व्यक्तीच्या नावे डिमॅट खाती उघडण्यात आली. या खात्यातून ६० कोटी रुपयांचे शेअर खरेदी करण्यात आले आहेत, अशी माहिती ईडीने छापे टाकल्यानंतर केलेल्या चौकशीतून समोर आली आहे.
त्या व्यक्तीच्या कुटुंबातील व्यक्तींच्या ७० बँक खात्यांची माहिती तपासातून समोर आली आहे. यातून उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती लपवण्यासाठी या बँक खात्यांचा वापर केल्याचे समोर आले आहे. रिअल इस्टेटमध्ये जवळपास १८ कोटी रुपये गुंतवले असून, रोख रक्कमेच्या स्वरूपात हा पैसा दिल्याचे पुरावे ईडीला मिळाले आहेत.
ईडीने खाती गोठवली
धाडी टाकल्यानंतर ही माहिती समोर आली. त्यानंतर ईडीने ६० कोटी रुपयांचे शेअर असलेले डिमॅट खाते आणि इतर ७० बँकांतील खाती गोठवली आहेत. त्याचबरोबर इतर १६ ठिकाणांहून १६ लाख रुपयांचे परदेशी चलन आणि २३ लाख रुपये रोख रक्कमही जप्त करण्यात आली आहे. भ्रष्टाचार केल्यासंदर्भातील अनेक पुरावेही ईडीला सापडले आहेत.
या प्रकरणात ईडीने यापूर्वी पाटणा, दिल्ली, कोलकाता, पुणे, मुंबई या शहरांसह हरयाणा आणि पंजाबमध्येही धाडी टाकल्या होत्या. या धाडींवेळी ईडीने ८० लाख रुपये रोख रक्कम ७० रुपये किंमत असलेले सोने, महागडी घड्याळे जप्त केली होती.