मुंबई : राज्यात सत्तांतर होताच सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. त्याची सुरुवात मंगळवारी झाली. सनदी अधिकारी श्रीकर परदेशी यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. परदेशी हे एप्रिल २०१५ पासून पंतप्रधान कार्यालयात संचालक म्हणून कार्यरत होते. गतवर्षी ते एक वर्षाच्या प्रशिक्षणासाठी विदेशात गेले होते. तिथून परतल्यानंतर आता त्यांची नियुक्ती उपमुख्यमंत्र्यांचे सचिव म्हणून करण्यात आली आहे.
आपल्या कार्यालयाचा कारभार अधिक गतिमान करण्यासाठी आणि विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पंतप्रधान मोदी यांनी विविध राज्यांमधील आयएएस अधिकाऱ्यांचा एक कोअर गट स्थापन केला होता. त्यात परदेशी यांचा समावेश होता.
मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांना मुंबई मेट्रो; मुंबईच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. अश्विनी भिडे यांनी दीर्घकाळ मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालकपद यशस्वीरीत्या सांभाळले आहे. उद्धव ठाकरे सरकारमध्ये त्यांची बदली मुंबई महापालिकेत करण्यात आली. आता त्या मुंबई मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक असलेले एस. व्ही. आर. श्रीनिवास यांच्याकडून पदभार स्वीकारतील.
ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब दांगडे यांची बदली कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या आयुक्तपदी करण्यात आली आहे. उल्हासनगर महापालिकेच्या आयुक्तपदी अजीज शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते मुख्याधिकारी (गट अ) श्रेणीचे अधिकारी आहेत.