कोल्हापूर जिल्ह्यात आता एक नाही तर दोन दोन महानगरपालिका असणार आहेत. इचलकरंजी नगरपरिषदेला महापालिकेचा दर्जा देण्यासाठी नगरविकास विभागाने अधिसूचना जारी केली.
इचलकरंजीचा महापालिका होण्याचा मार्ग आज मोकळा झाला. या नगरपरिषदेचे महापालिकेमध्ये रुपांतर केले जाणार आहे. खासदार धैर्यशील माने यांनी पाठपुरावा केला होता. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी महानगर पालिका करण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. वस्त्रोद्योगासाठी इचलकरंजी हे प्रसिद्ध असून लोकसंख्याही मोठी आहे. त्यामुळेच इचलकरंजी ही महानगरपालिका घोषित करावी यासाठी अनेक वर्षे मागणी सुरू होती. या पाठपुराव्याला यश आले आहे.
यामुळे राज्यात एकूण महापालिकांची संख्या आता २८ होणार आहे. इचलकरंजीमध्ये यापुढे महापौर बसणार आहे. इचलकरंजी पालिकेतील पाच खातेप्रमुखांची एक समिती गठीत करण्यात आली होती. त्यांनी पनवेल महापालिकेच्या धर्तीवर एक अहवाल तयार केला होता. हा अहवाल मान्य करण्यात आला असून कोणतीही हद्दवाढ केली जाणार नसल्याचे समजते आहे.