अकोला : जलयुक्त शिवार अभियानाची कामे तांत्रिकदृष्ट्या पूर्ण करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानाच्या जुन्या शासननिर्णयात (जीआर) बदल करुन नवीन शासन निर्णय जारी करण्याचा शासनाचा विचार आहे. गाव हे घटक धरण्याऐवजी लघू पाणलोट क्षेत्रालाच घटक धरण्यात येईल, असे केल्यास राज्य एका वर्षात टँकरमुक्त होईल आणि राज्यातील नाले, नद्या बारमाही वाहू लागतील, असा दावा खान्देशातील शिरपूर पॅटर्नचे जनक सुरेश खानापूरकर यांनी लोकमतशी बोलताना केला.एक वर्षापासून जलयुक्त शिवार अभियानात राज्यात नाल्यांचे खोलीकरण करण्यात येत असून, साखळी व सिमेंट बंधारे बांधण्यात येत आहेत; परंतु सध्याच्या शासन निर्णयानुसार गाव हा घटक धरू न नाला खोलीकरण, बंधार्यांची कामे केली जात आहेत. त्यामुळे माथा ते पायथा पाण्याचे संवर्धन होत नसल्याने कामात तांत्रिकदृष्ट्या बदल करावे लागणार आहेत. प्रत्येक नदीच्या पाणलोट क्षेत्रातील प्रत्येक लघू पाणलोट अंतर्गत लहान-मोठय़ा नाल्यांवर ३00 ते ५00 मीटर अंतरावर तांत्रिक अभ्यास करू न छोटे बंधारे बांधणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले. लघू पाणलोटाशिवाय जलयुक्त शिवार अभियान यशस्वी होणे अशक्य आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला बोलावून या विषयावर विचारमंथन केले. या संदर्भातील सर्व तांत्रिक बाजू लक्षात आणून दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी नवीन शासननिर्णयाचा मसुदा तयार करू न देण्याच्या सूचना केल्या आहेत. सध्या त्यावर काम सुरू असल्याचे सुरेश खानापूरकर, जलतज्ज्ञ यांनी सांगीतले.
जलयुक्त शिवार अभियानाच्या ‘जीआर’मध्ये बदलाचा विचार
By admin | Published: February 19, 2016 1:50 AM