- डॉ. शुभांगी रघुनाथ पारकरदिवसातून एकदा तरी आपण आपल्यावर किंवा इतर कुणावर तरी अन्याय झाला आहे असा घोष करतो. मी इतके कष्ट करते; पण मला मात्र प्रमोशन मिळाले नाही. जगात न्याय कसा तो नाहीच. जग फक्त अन्यायाने कसे भरले आहे या बिरुदाच्या मागे असलेली मानसिकता गंभीरपणे घ्यायला हवी. सर्वसाधारणपणे माणसांना नैतिक अधिकार वापरायला आवडतो. म्हणून तर आपण कोर्टात न्यायाधीश पाहतो. खेळांमध्ये जज असतात, पंचायत असते. चूक काय किंवा बरोबर काय हे समजण्याचा आपला जन्मजात स्वभाव आहे. त्यानुसार जगाने वागावे अशी आपली अपेक्षा असते. न्यायाने वागावे दुसऱ्यावर अन्याय करू नये ही तत्त्वप्रणाली आपल्या मनात ठाण मारून बसलेली असते. पण खरी वस्तुस्थिती अगदी वेगळी आहे. आपण खूप कष्ट करतो पण त्या प्रमाणात त्याचे फळ आपल्याला मिळेलच असे नाही. खूप अभ्यास करूनही विद्यार्थी परीक्षेत नापास होतात. खूप शिकूनसुद्धा साजेशी नोकरी मिळत नाही. प्रामणिक नसलेले भ्रष्टाचारी आयुष्यात कितीतरी पुढे जातात व आपण मात्र आहे तिथेच राहतो. याचाच अर्थ अतिशय चांगल्या माणसांना जीवनात अन्याय सोसायला लागतो. तर अनेक वाईट माणसांच्या आयुष्यात अकल्पितपणे चांगल्या घटना घडत असतात. अपेक्षेपेक्षा खूप यश कित्येक लायक नसलेल्या लोकांच्या पदरात पडते तर प्रचंड क्षमता असूनही काही लोकांच्या पदरी फक्त निराशाच पडते. म्हणजेच नीतीची जाणीव असून, सत्याची चाड असूनसुद्धा आयुष्य न्याय्य असायलाच हवे याची खात्री आपल्याला देता येत नाही. किंबहुना न्यायाचा तराजू आपल्या दृष्टिपथात सहजासहजी येत नाही. कारण शेवटी आपले जीवन बरे - वाईट, सत्य - असत्य यांच्या गुंतागुंतीचा गोंधळ आहे. अर्थात जीवनात अन्याय आहे ही काही मोठी समस्या नाही. पण आपली न्याय्य आयुष्याची कल्पना मात्र सत्य परिस्थितीवर आधारित नाही हे निश्चित. कारण ज्याला आपण आपल्याला न लाभलेला न्याय समजतो ते आपल्याला हवी असलेली पण न लाभलेली गोष्ट असते. जेव्हा - जेव्हा कोणी आपला अपमान केला वा आपल्याला दुखावले, आपल्याकडून एखादी गोष्ट हिरावून घेतली की, आपण ‘आम्हाला कुणी न्याय द्या हो’ असे गाऱ्हाणे घालतो. पण आपल्याला हेही माहीत असते की, प्रत्येक वेळी आपलाला न्याय मिळेलच असे नाही. शेवटी आपल्या आयुष्यात आपल्याला जे काही मिळते त्याच्याशी आपण उत्तम प्रकाराने जुळवून घेण्यातच आपले भले आहे. जेव्हा - जेव्हा कठीण काळातही एखादी सुख मानायची संधी मिळाली की, त्यातच सुख मानायचे. म्हणून तर तुटणारे अनेक संसार सुखी झाले असावेत. आशेचा किरण पाहणाऱ्यांनी आपल्यावर अन्याय झाला आहे असा मंत्र जपला असता तर त्या किरणांचा अनुभव त्यांना घेता आलाच नसता. अर्थात आपण काही साधुसंत नाही. माणसेच आहोत. आपल्याला कुणी दुखावले, आपल्यावर शारीरिक अत्याचार केले किंवा आपली मानसिक हानी केली की आपण त्यांचे कसे वाटोळे होईल याची वाट पाहत बसतो. किंवा आकाशातला देव आपले नुकसान करणाऱ्याला कसे दैवी शासन करून आपल्याला न्याय देईल यासाठी प्रार्थना करतो. दुसऱ्याशी तुलना करायची, स्पर्धा करायची सवय माणूस म्हणून आपल्याला आहेच. आपल्याला प्रत्यक्ष काही कमी पडलं नाही, तरी दुसऱ्याकडे अलोट यश पाहता आपल्या मनात खोल खड्डा पडतो. आपले मन मग त्यांच्यात काय चांगल्या गोष्टी कमी पडत आहेत, त्यांच्या कुठल्या गोष्टी बरोबर नाहीत, त्यांचे विचार कसे हीन आहेत असे बरेच काही शोधत राहतो. या आपल्यातल्या चांगल्या गोष्टी बहुधा नैतिकतेच्या व मानवतेच्या असतात. कारण दुसऱ्यांचे ‘सगळे उत्तम चालले आहे’ हे आपल्याला पचत नाही. दुसऱ्याच्या आनंदाने आपण असे दु:खी व्हावे हा माणसाचा सर्वसाधारण स्थायीभाव आहे. ज्यांची सुखाची व्याख्या यापेक्षा वेगळी आहे, अशी माणसे या जगात आहेत; पण ती दुर्मीळ आहेत. न्यायाची संकल्पना ही तशी खऱ्या अर्थाने सिद्ध करण्यासाठी नाही. ते आपल्या मनीच्या विचारांचे एक वलय आहे. त्या वलयात आपणच भिरभिरत असतो. आयुष्य या जगातल्या प्रत्येक माणसासाठी यथार्थ देणार असेल तर खरंच आपण समाधानी राहू शकू? आपल्याला हवा असलेला आनंद मिळेल? अशी परिस्थिती खरंच निर्माण झाली तर नाती फक्त मरणानंतरच संपतील. खरेतर, आपल्या आयुष्यात एखादी गोष्ट न्यायाची किंवा अन्यायाची असते का, हा प्रश्न खूप गंभीर आहे. पण काही गोष्टी दुसऱ्याच्या हकनाक बळी घेणाऱ्या असतात तेव्हा त्या खऱ्या अन्यायकारक असतात. रोजच्या जीवनात एखाद्याचे सुखाचे पारडे थोडे जास्त जड म्हणजे दुसऱ्यावर अन्याय झाला असे म्हणता येणार नाही. ते आपल्या दृष्टीवर अवलंबून असते. या जगाच्या अस्तित्वासाठी काही गोष्टी अमुक पद्धतीनेच घडणार. त्या प्रत्येकाच्या मर्जीनुसार नक्कीच घडत नाहीत. म्हणूनच प्रत्येकाच्या सुखाची आणि दु:खाची व्याख्या, गरिबी - श्रीमंतीची भाषा, चांगल्या - वाईटाची कल्पना तशी सापेक्ष असणारच. पण दुसऱ्याच्या बुटांमध्ये पाय घालून नक्की कुठे खुपते हे सचोटीने समजून घेणाऱ्याला मात्र न्यायाची भाषा कळेल हे खरे. या जगात प्रत्येकाचं आयुष्य वेगळ्या पद्धतीने उलगडते आणि ते तसे का, या प्रश्नाचे उत्तर आपल्याकडे नाही. आपण ठरविले म्हणून जगानेही तसेच केले पाहिजे अशा विचारांनी ग्रस्त असतो तेव्हा नैसर्गिकदृष्ट्या ज्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडतात त्यात काहीतरी सत्य आहे व तथ्य आहे हे आपल्याला लक्षात येत नाही. किंबहुना त्या वास्तवाकडे आपले लक्ष नसते. म्हणजे जेव्हा आपल्यावर अन्याय झाला असे आपल्याला वाटते, आपल्या ताटात इतरांपेक्षा दान कमी पडले असे आपल्याला वाटते तेव्हा हा नियम कोणी केला? बऱ्याचशा घटनांमध्ये आपण घेतलेल्या निर्णयांमुळे एखाद्याला न्याय मिळाला पण दुसरा मात्र अन्यायाने रडला तर आपला निर्णय न्यायाचा की अन्यायाचा हे कुणी ठरवायचे? ज्या वेळी एखाद्या गोष्टीचा निर्णय आपल्या बाजूने नसतो तेव्हाच आपण अन्यायाचा लढा लढू लागतो. नाहीतर, आपल्याला तसा दुसऱ्यांच्या अन्यायाबद्दल फारसा फरक पडत नाही.
आयुष्याची कल्पना
By admin | Published: September 04, 2016 2:32 AM