मुंबई : कोल्हापूरसह राज्यातील काही जिल्ह्यांना पर्यटन जिल्ह्याचा दर्जा देण्याचा विचार करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत दिले. कोल्हापूर जिल्ह्याच्या पर्यटन विकासाचा ५२० कोटी रुपयांचा आराखडा जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाला सादर केला आहे, असे ते म्हणाले. ५२० कोटी रुपयांचा निधी एकाचवेळी देणे शक्य नसल्याने प्राधान्यक्रमाने पाच महत्त्वाची कामे सुचवावीत, असे कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे. ती तत्काळ मंजूर केली जातील. पर्यटन जिल्हा कोणता यासंबंधीचे निकष ठरविण्यात येत आहेत. या निकषांत बसतील त्यांना पर्यटन जिल्हे म्हणून घोषित केले जाईल आणि त्यात कोल्हापूरचाही विचार केला जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. आमदार प्रकाश आबिटकर, राजेश क्षीरसागर, उल्हास पाटील, डॉ. सुजित मिणचेकर, चंद्रदीप नरके यांनी कोल्हापूर जिल्ह्याच्या पर्यटनाच्या समस्या लक्षवेधी सूचनेद्वारे मांडल्या. कोल्हापूर जिल्ह्याला पर्यटन हब म्हणून जाहीर करा, राधानगरी, भुदरगड आणि आजरा हे पर्यटन तालुके म्हणून जाहीर करण्याची मागणी नरके यांनी केली.
कोल्हापूर पर्यटन जिल्हा करण्याचा विचार
By admin | Published: July 15, 2015 12:48 AM