मुंबई : पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी रस्त्यासोबतच पाण्यावरही धावू शकणारी ‘अॅम्फिबियस’(उभयचर) बस मुंबईत चालविण्याचा निर्णय याआधीच घेण्यात आला होता. आता या प्रवासाचा आनंद वाढविण्यासाठी बसमध्ये अन्य खाद्यपदार्थांसोबतच वाइन व बीअरही पुरविण्याचा विचार एमटीडीसीकडून (महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ) केला जात आहे. सार्वजनिक रस्ते वाहतुकीत मद्य पुरविण्याचा हा देशातील पहिला प्रयोग असल्याचे मानले जात आहे.मुंबईत मोठ्या प्रमाणात विदेशी पर्यटक येतात. मात्र त्यांना चौपाट्यांव्यतिरिक्त अन्य फार पर्याय उपलब्ध नाहीत. या पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी एमटीडीसीने जेएनपीटीमार्फत (जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट) अॅम्फिबियस बसची नवी संकल्पना राबवण्याचा निर्णय घेतला. परदेशातील अशा बसना पर्यटकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत बसचे काम पूर्ण होऊन ती मुंबईत दाखल होण्याची शक्यता असल्याचे एमटीडीसीतील सूत्रांकडून सांगण्यात आले. पर्यटकांना या बसमधून दोन तास प्रवास घडवला जाणार आहे. या प्रवासात खाद्यपदार्थ आणि मद्य पुरविण्याचा विचार सुरू असल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)चार कोटींची बसया बसमधून प्रवासासाठी प्रतिव्यक्ती ६०० रुपये किंवा त्यापेक्षाही अधिक शुल्क आकारण्याचा विचार केला जात आहे. या ५० आसनी बसची किंमत ४ कोटी असून, ती प्रामुख्याने दक्षिण मुंबईत चालविण्यात येणार आहे.
‘अॅम्फिबियस बस’मध्ये मद्य पुरविण्याचा विचार!
By admin | Published: July 05, 2016 1:31 AM