विनोद भोईर/ लोकमत न्यूज नेटवर्कपाली : सर्वसामान्यांचे व आदिवासींचे महागाईने कंबरडे मोडले आहे. त्यात मुला-मुलीचा विवाह करणे म्हणजे खिशाला कात्री, यासाठी वडील कर्ज घेऊन लग्न करतात आणि आयुष्यभर या कर्जाच्या ओझ्याखाली राहतात. या सर्व गोष्टींचा विचार करून सुधागड तालुक्यातील उद्धर ग्रामपंचायत हद्दीतील चेरफलवाडीतील आदिवासी बांधवांनी आपल्या मुला-मुलींच्या लग्न समारंभावरील वायफळ खर्च व विनाकारण सावकाराच्या कर्जात बुडण्यापेक्षा सामूहिक विवाह पद्धतीचा रामबाण उपाय शोधून काढला आहे. यावर गावपातळीवर बैठक घेऊन ते सत्यात उतरविले.२ मे रोजी चेरफलवाडी येथे १४ जोडप्यांच्या सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन गावपातळीवर करण्यात आले होते. या विवाह सोहळ्यासाठी शासनाकडून एकही रुपयाची मदत किंवा कोणतेही सहकार्य न घेता या सोहळ्याचे नियोजन केले होते. विवाह सोहळ्यात चेरफलवाडी येथील १४ नवरदेव, तर ५ नवऱ्या मुली व इतर तालुक्यातील ९ मुलींनी सहभागी होऊन, या सामूहिक विवाह सोहळ्यात सप्तपदी घेतली.या सामूहिक विवाह सोहळ्याला पेण-सुधागडचे कार्यक्षम आमदार धैर्यशील पाटील, शेकापनेते अॅड. सुभाष पाटील, शशिकांत आचार्य, निवृत्त शिक्षक गणपत बांगारे, पोलीस अधिकारी गणपत पिंगाला, उद्धर ग्रा. पं. उपसरपंच वसंत बांगारे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या विवाह सोहळ्याच्या आयोजनासाठी निवृत्त शिक्षक गणपत बांगारे यांच्या मार्गदर्शनाखाली दामा निरगुडे, वसंत बांगारे, नारायण हंबीर, राजू बांगारे यांच्यासह वाडीतील ग्रामस्थ, तरु ण व महिलांनी परिश्रम घेतले. विवाह सोहळ्याचे सूत्रसंचालन शिक्षक राजू बांगारे यांनी केले.आम्ही राबविलेल्या या सामूहिक विवाह सोहळ्यामुळे सहभागी झालेल्या १४ जोडप्यांच्या वडिलांचे किमान प्रत्येकी लाख ते दीड लाख रुपयांची बचत झाली आहे.- गणपत बांगारे, निवृत्त शिक्षक आम्ही शासनाकडून कोणत्याही प्रकारचे अनुदान न घेता गावपातळीवर बैठक घेऊन लग्नसमारंभात वायफळ होणाऱ्या खर्चावर लगाम घालण्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.- वसंत बांगारे, उपसरपंच, उद्धर
चेरफलवाडी आदिवासी बांधवांचा आदर्श निर्णय
By admin | Published: May 06, 2017 6:10 AM