पुणे : दहावीमध्ये इंग्रजी व गणित विषयामध्ये नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक असते. पण या विषयांत नापास म्हणजे आयुष्यात नापास होत नाही. ही मानसिकता बदलून या विषयांना पर्याय देण्याबाबत विचाराधीन असल्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सोमवारी येथे सांगितले.सिम्बायोसिसचे कुलपती डॉ. शां. ब. मुजुमदार यांच्याविषयी ज्येष्ठभूगर्भ अभ्यासक डॉ. सतीश ठिगळे यांनी लिहिलेल्या ‘सर, माझ्या चष्म्यातून’ या पुस्तकाचे प्रकाशन सोमवारी झाले. त्याप्रसंगी तावडे बोलत होते. आमदार मेधा कुलकर्णी, विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अरुण निगवेकर, निवेदक सुधीर गाडगीळ, अभिजित प्रकाशनचे अभिजित वाळिंबे आदी उपस्थित होते. तावडे म्हणाले, ‘‘सध्या इंग्रजी व गणित विषयांत नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक आहे. या विषयांत नापास झाले की काही विद्यार्थी परत कधीच पास होत नाही. त्यामुळे या विषयाला पर्याय देण्याबाबत विचार करण्याची गरज आहे. त्यासाठी शिक्षणतज्ज्ञांना मागील दहा वर्षांचा दहावीच्या निकालाचा अभ्यास करून याबाबत विचार करण्याचे सांगितले आहे. सर्व बाजूंनी विचार करूनच पर्याय ठरवावे लागतील.’’ डॉ. ठिगळे म्हणाले, ‘‘गुरू, सहकारी आणि मित्र अशा दीर्घ प्रवासात डॉ. मुजुमदार यांचे भावलेले गुण, तसेच त्यांच्यातील काही दोषही पुस्तकात मांडण्यात आले आहेत. सिम्बायोसिसमधील त्यांचा प्रवास, त्यांचे व्यक्तिमत्त्व खूपच प्रभावित करून गेले.’’डॉ. मुजुमदार यांचा प्रवास गुणांसह काही उणिवा दाखवत तटस्थपणे मांडल्याचे सुधीर गाडगीळ यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
इंग्रजी व गणिताला पर्याय देण्याचा विचार
By admin | Published: September 13, 2016 1:37 AM