मुंबई : नऊ महिन्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करूनदेखील राज्य राखीव पोलीस दलातील (एसआरपीएफ) जवानांच्या माथी २८ ते ३२ कोर्सेस मारले जातात. या कोर्सेसच्या नावाखाली जवानांच्या होत असलेल्या कोंडीबाबत ‘लोकमत’मध्ये वाचा फोडण्यात आली. त्यात जवानांच्या साप्ताहिक सुटीबरोबरच त्यांच्या अतिरिक्त कोर्सेसबाबतचा अभिप्राय १६ गटांतील समादेशकांकडून मागविण्यात आला आहे. राज्य राखीव पोलीस दलाचे अपर पोलीस महासंचालक संदीप बिश्नोई यांनी हे आदेश दिले आहेत. पुण्यातील दौंड येथे राज्य राखीव पोलीस दलाचे एकमेव नानवीज प्रशिक्षण केंद्र आहे. या केंद्रातून नऊ महिन्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करूनदेखील जवानांना कामादरम्यान प्रत्येकी एक ते दोन महिने कालावधीचे २८ ते ३२ कोर्समुळे त्यांच्या नाकीनऊ येत आहे. नऊ महिन्यांत जे काही शिकवले जाते त्याचाच अधिकांश भाग या कोर्सेसमध्ये असतो. तरीही हे कोर्सेस बळजबरीने त्यांच्याकडून करून घेतले जातात. याचा परिणाम त्यांच्या साप्ताहिक सुट्ट्यांबरोबर जिल्हा बदलीवरही होत आहे. याबाबत ‘लोकमत’ने २४ आणि २५ एप्रिलच्या अंकात ‘जवानांचीच छळछावणी’द्वारे जवानांची व्यथा मांडली. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही जवानांनी आपल्या व्यथा मांडून वरिष्ठांच्या सुरू असलेल्या कारभाराबाबत खंत व्यक्त केली. अनेकदा जवानांच्या तक्रारी ऐकण्यासाठी भरलेल्या दरबारात वरिष्ठांचा कौतुक सोहळाच पार पडतो. अशात त्यांच्या मागण्या दुर्लक्षितच राहत असत. ‘लोकमत’च्या वृत्तानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने जवानांची दखल घेण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या साप्ताहिक सुटीबरोबर प्रशिक्षण केंद्रात सुरू असलेले कोर्सेस सुरू ठेवायचे की नाही याबाबत १६ गटांतील समादेशकांडून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. राज्य राखीव पोलीस दलाचे अपर पोलीस महासंचालक संदीप बिश्नोई यांनी हे आदेश दिले आहेत. समादेशकांनी सर्व गटांतील पोलीस अधिकारी, कर्मचारी यांचे संमेलन घेऊन त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात; शिवाय त्यांचे विचार, मागण्या या अहवालात नमूद करण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)कोर्सेसबाबत १६ गटांतील समादेशकांडून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. राज्य राखील पोलीस दलाचे अपर पोलीस महासंचालक संदीप बिश्नोई यांनी हे आदेश दिले आहेत. एसआरपीएफच्या जवानांच्या प्रश्नांबाबत ‘कोर्सेसच्या नावाखाली जवानांची गळचेपी’ हे वृत्त प्रसिद्ध केले होते.
जवानांच्या कोर्सेसबाबत होणार विचार
By admin | Published: May 02, 2016 1:05 AM