ठाणे : विचारांची हत्या होते आहे. मुस्कटदाबी सुरू आहे. मोकळेपणाने जगता येतेय का, मोकळा श्वास घेता येईल का, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. सुधारणांना शांततेने विरोध करा. चर्चा होऊ द्या; पण आता संवादच खुंटतो आहे, अशी भीती खासदार सुप्रिया सुळे यांनी मांडली.यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या ठाणे जिल्हा केंद्रातर्फे गुरुवारी नरेंद्र बल्लाळ सभागृहात ‘विचारकुंकू’ या कार्यक्रमात प्रा. नितीन आरेकर यांनी घेतलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या. चार-पाच वर्षांपूर्वी आपण कोणत्या समाजाचे आहोत, याचा विचार होत नसे; पण आता आंतरजातीय विवाहाला विरोध होतो. पुरोगामी महाराष्ट्र हा ‘रिव्हर्स’ चालला आहे. एका काळात शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे मनमोकळेपणाने एकमेकांवर टीका करत. त्यांनी मैत्री टिकवली. हल्ली असे बोलायची भीती वाटते. देशात भीतीचे वातावरण आहे; पण त्याविरोधात लोकांनी निर्णय घ्यावा, अशी भूमिका त्यांनी मांडली.सरकारच्या शाळा बंद करण्याच्या भूमिकेबद्दल, पद्मावतला होणाºया विरोधाबद्दल त्यांनी नापसंती व्यक्त केली. खूप मतदान झाले, खूप यश मिळाले की ते त्या विचारसरणीचे यश असल्याचे मी मानत नसल्याचा टोला त्यांनी लगावला. भिडे, एकबोटे यांच्यावर गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक का होत नाही, हे गृहमंत्रिपद सांभाळणाºया मुख्यमंत्र्यांचे अपयश आहे, अशी टीका त्यांनी केली.
विचारांची हत्या ,मुस्कटदाबी सुरू - सुप्रिया सुळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2018 3:32 AM