राजकीय गरज ओळखा अन्...; प्रकाश आंबेडकरांचा महाविकास आघाडीला सूचक इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2024 07:49 AM2024-03-02T07:49:15+5:302024-03-02T07:50:02+5:30
ठाकरेंचे मतदार काँग्रेसकडे वळतील का याबाबत सांशकता आहे. हा मतदार आमच्यापेक्षा भाजपाकडे वळू शकतो ही काँग्रेसला भीती आहे.
नागपूर - जागावाटपाबाबत ३ पक्ष चर्चा करतात, बैठक सुरू असते तेव्हा आम्ही बाहेर बसलेलो असतो. आमची यादी आम्ही त्यांना दिलीय. आता त्यांनी आम्हाला कळवायचं आहे. जर युती झाली नाही तर आम्ही २७ मतदारसंघात फोकस करणार होतो ती यादी त्यांना दिली. गेल्या ३० वर्षाचं राजकारण हे तडजोडीचे होते. कुणी कुठे लढायचं हे फिक्स होते. ज्या मतदारसंघात ते लढले तिथे त्यांची ताकद आहे. आम्ही मोदींविरोधात जी कोंबडी शिजवली ती सगळ्यांनी मिळून खाल्ली पाहिजे. आज शिवसेना ठाकरे-राष्ट्रवादी शरद पवार केवळ नोंदणीकृत पक्ष आहे. परंतु त्यांना ओळख निर्माण करायचीय. त्यासाठी ठराविक मते आणि लोकप्रतिनिधी निवडून यायला हवेत. त्यामुळे ही गरज त्यांची आहे तशी आमचीही आहे. त्या गरजेला ओळखून वाटाघाटी झाल्या पाहिजेत असा सूचक इशारा प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीला दिला.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आम्हाला २ मतदारसंघात ताकद उभी करता आली नाही. ४६ मतदारसंघात ताकदीने आहोत. आम्ही अडीच लाखाच्या आसपास मते आमच्याकडे आहेत. भाजपाला टार्गेट आमच्याशिवाय कुणी करत नाही. ज्या दिवशी मी जाहीर करेन तेव्हा लक्षात येईल. महाविकास आघाडीच्या ज्या काही बैठका झाल्या त्यात ३ पक्ष चर्चेला बसतात. त्यांची चर्चा झाल्यानंतर वंचितला बोलवतात. आम्ही वंचित आहोत, उपरे आहोत. बैठकीतही उपरे आहोत. बैठकीतील चर्चेत बोलवल्यावर सहभागी होतो. मी राजकीय वस्तूस्थिती मांडतोय. माझ्याकडे ४८ उमेदवार आहेत. गेल्यावेळी काँग्रेस-भाजपाने आम्हाला नुकसान पोहचवलं, मुस्लीम मतदार त्यांच्याकडे गेले. दलित-मागासवर्गीय मतदार आमच्याकडे वळाले. त्यामुळे गरज ओळखून जागावाटपाची चर्चा करा. आम्ही शेवटपर्यंत युतीसाठी प्रयत्न करू असं त्यांनी सांगितले.
तसेच ठाकरेंचे मतदार काँग्रेसकडे वळतील का याबाबत सांशकता आहे. हा मतदार आमच्यापेक्षा भाजपाकडे वळू शकतो ही काँग्रेसला भीती आहे. त्यामुळे मी आघाडीत राहावे असं काँग्रेसला वाटते. मी शेवटपर्यंत प्रयत्न करेन. आम्ही किमान ६ जागा जिंकू शकतो. आमचा राजकीय अजेंडा नाही. सामाजिक परिवर्तन हा आमचा अजेंडा आहे असंही आंबेडकरांनी म्हटलं.
दरम्यान, जरांगे पाटील यांच्यामुळे जे आंदोलन उभं राहिले त्यामुळे ओबीसी जागरुक झाला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीनं आतापर्यंत निजामी मराठा यांची पाठराखण केली आहे. असेच जर झाले तर हा जागरुक झालेला ओबीसी हा भाजपाच्या दिशेने जाईल. जर असं करायचं नसेल तर भाजपाविरोधात बनलेली आघाडी ही घराणेशाहीला पोसत नाही. काही कुटुंबाला पोसत नाही. कुठल्या जातीव्यवस्थेला पोसत नाही हे पटवून द्यायचे असेल तर महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये किमान १५ उमेदवार ओबीसी हवेत. आतापर्यंत एकच माळी समाजाचा धरला तर उरलेल्या कुठल्याही समाजाचा खासदार झालेला नाही. भाजपा काही जणांना वगळून राजकारण करते, विशेषत: अल्पसंख्याकांना वगळून राजकारण करते. त्यामुळे उमेदवार यादीत किमान ३ उमेदवार हे अल्पसंख्याक असले पाहिजे अशी मागणी प्रकाश आंबेडकरांनी केली.