मुंबई : संरक्षण दलातील जवानांना, अधिकाऱ्यांना सकस आणि उत्तम प्रतिचा आहार मिळावा, यासाठी विशेष काळजी घेतली जाते. संरक्षक दलाच्या संशोधन व विकास विभागाने (डी.आर.डी.ओ.) भेसळयुक्त दूध शोधण्यासाठी एक संच तयार केला आहे. संरक्षण दलात यशस्वीरीत्या या संचाचा वापर झाल्यानंतर हा संच आता सामान्यांसाठीदेखील उपलब्ध करून दिला जाणार आहे. दुधातील भेसळ ओळखण्यासाठी खास तयार करण्यात आलेल्या संचात बाटल्या आणि दूधपट्ट्यांचा समावेश आहे. संचातील बाटलीत थोडेसे दूध टाकून त्यात एक दूधपट्टी बुडवावी. अवघ्या पाच मिनिटांत दुधाचा रंग बदलतो आणि भेसळ उघड होते. मात्र चाचणी केलेले दूध पुन्हा वापरता येत नाही. दुधात भेसळ करण्यात येणाऱ्या प्रचलित आठही घटक शोधण्याचे काम हा संच करतो. तसेच दूध ताजे की शिळे हेही दाखवण्याचे काम या ‘दूधपट्ट्या’ करतात. या पट्ट्या लवकरच औषधांच्या दुकानात उपलब्ध होणार आहेत.केंद्र सरकारच्या एका पाहणीनुसार, देशातील ७० टक्के दूध हे भेसळयुक्त असते. मुंबईतील दूध भेसळीचे प्रमाण तब्बल ४५ टक्के इतके आहे. दुधात भेसळ किती प्रमाणात आणि कोणती रसायने आहेत, यावर आजाराचे गंभीर परिणाम अवलंबून असतात. काही आजार लगेचच परिणाम दाखवतात तर काही आजार हळूहळू शरीरावर परिणाम करतात. गरोदर महिला, वृद्ध, अर्भके यांच्या आरोग्यावर कृत्रिम, भेसळयुक्त दुधाचा परिणाम होण्याचा धोका सर्वाधिक असतो. अन्न व औषध प्रशासन सक्षमपणे काम करत असल्यामुळे आत्तापर्यंत हजारो लीटर भेसळयुक्त दूध पकडण्यात आले आहे. दुधातील भेसळ ओळखण्यासाठी सरकारमान्य प्रयोगशाळेत दुधाचे नमुने चाचणीसाठी पाठवणे हा मार्ग आहे. पण, यासाठी वेळ आणि पैसा खर्च करावा लागतो. जो सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असतो. शिवाय सरकारी चक्रात अडकण्याची त्यांची तयारी नसते. त्यामुळे भेसळ करणाऱ्यांना मोकळे रान मिळत असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले.
दूध भेसळ ओळखणे आता सामान्यांना शक्य
By admin | Published: November 24, 2015 2:37 AM