Jitendra Awhad News: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालाने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. सत्ताधारी महायुतीने जबरदस्त मुसंडी मारत प्रचंड बहुमत मिळवत सत्तेत घरवापसी केली. तर महाविकास आघाडीचा मानहानीकारक पराभव झाला. विधानसभेत विरोध पक्षनेता नसेल अशी अवस्था विरोधकांची झाली आहे. या निकालानंतर जितेंद्र आव्हाडांनी एक पोस्ट करत खंत व्यक्त केली आहे.
८५ जागा निवडणूक लढवणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीला अवघ्या दहा जागा मिळाल्या आहेत. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने तब्बल ४१ जागा जिंकल्या आहेत. या निकालाबद्दल बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भविष्यातील राजकारणाबद्दल खंत व्यक्त केली आहे.
जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?
"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं. यापुढील निवडणुका फक्त अर्थकारणावरच होणार आहेत; किंबहुना त्या आर्थिक ताकदीवरच लढल्या जातील, अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. ज्याचा आर्थिक पुरवठा मजबूत तोच निवडणुकीत टिकेल. आता शिव, फुले, शाहू,आंबेडकरांचा महाराष्ट्र फक्त बोलण्यापुरताच उरलाय", असे भाष्य जितेंद्र आव्हाड यांनी भविष्यातील राजकारणाबद्दल केले आहे.
महाविकास आघाडीला जबर धक्का
महाविकास आघाडीतील तिन्ही प्रमुख पक्षाचा मानहानीकारक पराभव झाला. सर्वाधिक जागा लढवणाऱ्या काँग्रेसला अवघ्या १६ जागा जिंकता आल्या. तर त्यानंतर ९५ जागा लढवणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला २० जागा जिंकल्या. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ १० जागाच जिंकता आल्या.
महायुतीची जबरदस्त मुसंडी
सर्वाधिक जागा लढवणाऱ्या भाजपने सर्वाधिक जागा जिंकत बहुमताच्या उंबरठ्यापर्यंत मजल मारली. एकट्या भाजपने १३२ जागा जिंकल्या. सर्वाधिक जागा भाजपने काँग्रेसविरोधात जिंकल्या. तर शिंदेंच्या शिवसेनेनंही ५७ जागा जिंकल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला किती जागा मिळतील, याबद्दल वेगवेगळ्या चर्चा होत्या, पण अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने ४१ जागा जिंकत सगळ्यानाच धक्का दिला.