मुंबई : बदलत्या काळानुसार भाषांमध्येही बदल होताना दिसत आहेत. व्यवसाय-उद्योगधंदा, कॉर्पोरेट क्षेत्रांमध्ये बोली भाषेपेक्षा प्रमाण भाषेचा वापर वाढत असून बोली भाषेचा वापर कमी होत आहे. बोली भाषेचा वापर करणारी लोक गावंढळ समजली जात असल्याने त्याचा वापर टाळला जातो. हीच प्रथा पुढच्या काही वर्षांत रूढ झाल्यास बोली भाषा नष्ट होईल. बोली भाषा टिकवण्यासाठी साहित्य निर्मितीत बोली भाषा वापरली जाणे आणि लोकांनी बोली भाषेचा उपयोग करणे आवश्यक असल्याचे मत लेखक महेश लीला पंडित यांनी व्यक्त केले. मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेने (आयडॉल) ‘मराठी भाषा दिना’निमित्त आयोजित केलेल्या ‘अनुवादाचे मोती मराठीत’ या अनुभव कथनाच्या कार्यक्रमात पंडित बोलत होते. पंडित पुढे म्हणाले, भाषेचे जेवढे जास्त प्रोटोटाइप असतील तेवढी तुमची भाषा प्रगल्भ असते. बोली भाषेमध्ये प्रमाण भाषेची सरमिसळ झाली आहे. यामुळे बोली भाषेची कत्तल होत आहे. त्यावर प्रमाण भाषेचे आक्रमण होत आहे. कोणत्याही प्रमाण भाषेच्या अगोदर बोली भाषा असते. म्हणून बोली भाषा वाचणे महत्त्वाचे आहे. आयडॉलच्या संचालिका व अनुवादिका डॉ. अंबुजा साळगावकर यांनी सांगितले की, अनुवाद म्हणजे शब्दापुढे शब्द नसतात, ते मनाला भावले पाहिजे. सर्वसामान्यांच्या भाषेत ते लिहिणे आवश्यक असते. या वेळी रुडयार्ड किपलिंग, विद्यापीठ गीत, अॅलेक्स इन वंडरलँड, रवींद्रनाथ टागोर, एपीजे अब्दुल कलाम अशा त्यांनी केलेल्या विविध अनुवादासंबंधीची माहिती दिली .याप्रसंगी छायाचित्रकार प्रकाश कदम म्हणाले, मराठीत बोला, मराठीत संवाद साधा असे सांगून मराठी पाऊल पडते पुढे ऐवजी मराठी पाऊल पडते मागे अशी आज अवस्था असू ही खंताची बाब आहे़ (प्रतिनिधी)
आयडॉलमध्ये मराठी भाषा दिन साजरा
By admin | Published: February 28, 2017 2:24 AM