सांगली : राम-लक्ष्मण पुरुष होते. आजपर्यंत त्यांच्या कोणत्याही प्रतिमांमध्ये त्यांना मिशा दाखविल्या गेल्या नाहीत. त्यामुळे अयोध्येतील राम मंदिरातील मूर्ती तयार करताना त्यांना मिशा असाव्यात, अशी मागणी आम्ही राम मंदिराचे पुजारी गोविंदगिरी महाराजांकडे केल्याचे शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
भिडे म्हणाले, राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा दिवाळीसारखा, राष्ट्रीय उत्सव म्हणून साजरा करावा. ज्या छत्रपती शिवरायांनी हिंदू धर्माच्या रक्षणाचे अत्यंत मोलाचे कार्य केले, त्यांची प्रतिमाही भूमिपूजनावेळी पुजावी, अशी मागणी गोविंदगिरी महाराजांकडे केली आहे. हिंदूधर्मियांनीही रामाबरोबर छत्रपती शिवरायांची पूजा त्यादिवशी घरा-घरामध्ये करावी. भूमिपूजनासाठी शिवरायांच्या ३२ किल्ल्यांवरील माती व सरोवराचे पाणी आम्ही पाठवत आहोत. भिडे म्हणाले, भूमिपूजनाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी केलेले वक्तव्य योग्य नाही. हे दोन्ही नेते वंदनीय आहेत. त्यामुळे त्यांनी महाराष्टÑाच्यावतीने राम मंदिराच्या भूमिपूजनास उपस्थित राहावे. शिवसेना हिंदू धर्मरक्षणासाठी आवश्यक आहे.