पुणे : सीबीएसई बोर्डाने दहावीनंतर बारावीच्या परीक्षा रद्द केल्याने महाराष्ट्रातही राज्य मंडळाच्या बारावीच्या परीक्षा रद्द होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमाचे प्रवेश बारावीच्या गुणांवर अवलंबून नसले तरी प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी बारावीच्या गुणांचाच विचार केला जातो. त्यामुळे परीक्षा रद्द झाल्यास प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी सीईटी परीक्षा घ्यावी लागेल, असे मत प्राचार्यांकडून व्यक्त केले जात आहे.या परीक्षा रद्द झाल्यास शहरी भागातील विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तसेच विद्यार्थ्यांना बारावीतील विविध विषयांमधील संबंधित घटकाचे ज्ञान झाले किंवा नाही, हे पाहणे गरजेचे आहे. त्यासाठी घरी राहून विद्यार्थ्यांकडून लिखित स्वरूपात काही प्रश्नांची उत्तरे मागविण्याचा विचार करावा, अशी मागणी प्राचार्यांनी केली आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नीट, जेईई, सीईटी आदी परीक्षा घेतल्या जातात. कोरोनामुळे परीक्षा रद्दचा निर्णय घेतला जाऊ शकतो. परंतु, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताच्या दृष्टीने त्यांना काही प्रश्नांची उत्तरे घरी बसूनच लिहिण्यास सांगितली पाहिजे. त्यातून विद्यार्थ्याला विषय समजला आहे किंवा नाही, हे जाणून घेता येईल. पायाभूत गोष्टींचे ज्ञान गरजेचे असल्याने परीक्षा महत्त्वाच्या ठरतात.- डॉ. के. सी. मोहिते, प्राचार्य, सी. टी. बोरा कॉलेजविद्यापीठस्तरावरील पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी बारावीचे गुण विचारात घेतले जातात. परंतु, परीक्षा रद्द झाल्या तर प्रथम वर्ष पदवी प्रवेशाचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे सीईटी परीक्षा घ्यावी लागेल.- डॉ. संजय खरात, प्राचार्य, मॉडर्न महाविद्यालय, पुणे
बारावी परीक्षा रद्द झाल्यास सीईटी घ्यावी लागणार; प्राचार्यांचे मत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2021 8:47 AM