मुंबई : कोरोनावरील कोविशिल्ड लसीचे उत्पादन करणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी सुरक्षा देण्यासंदर्भात विनंती केली तर त्यांना देऊ, असे राज्य सरकारने उच्च न्यायालयाला शुक्रवारी सांगितले.
सरकारच्या या विधानानंतर उच्च न्यायालयाने पुनावाला यांना सुरक्षा देण्यासंदर्भात दाखल जनहित याचिका निकाली काढली. केंद्र सरकारने आधीच पुनावाला यांना ‘वाय’ दर्जाची सुरक्षा पुरविली आहे. तरी पुनावाला यांना येणाऱ्या धमक्यांमुळे त्यांना ‘झेड’ दर्जाची सुरक्षा द्यावी, अशी याचिका वकील दत्ता माने यांनी दाखल केली. त्यावरील सुनावणी न्या. एस.एस. शिंदे व न्या. एन. जे. जमादार यांच्या खंडपीठापुढे होती.
सरकार त्यांना पुरेशी सुरक्षा पुरवेल. आम्ही अशी याचिका दाखल करून घेऊ शकत नाही. त्यांना सुरक्षा नको असेल तर? इथे त्यांच्या सुरक्षेसाठी याचिक दाखल केली आहे, याची त्यांना माहितीही नसेल, असे म्हणत न्यायालयाने याचिका निकाली काढली.