अजित पवार भेकड नाहीत तर स्वत:चा पक्ष का नाही काढला? शरद पवार गटाकडून १० तिखट सवाल 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2023 05:05 PM2023-11-30T17:05:23+5:302023-11-30T17:05:55+5:30

शरद पवार गटाकडून सुनील तटकरेंवर पलटवार करत प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली आहे.

If Ajit Pawar is not a coward why did he not form his own party 10 questions from Sharad Pawar group | अजित पवार भेकड नाहीत तर स्वत:चा पक्ष का नाही काढला? शरद पवार गटाकडून १० तिखट सवाल 

अजित पवार भेकड नाहीत तर स्वत:चा पक्ष का नाही काढला? शरद पवार गटाकडून १० तिखट सवाल 

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोन गटांत विभागला गेल्यानंतर आज कर्जत येथे अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाच्या दोन दिवसीय राज्यव्यापी शिबिराला सुरुवात झाली आहे. या शिबिरात बोलताना प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शरद पवार गटाकडून होत असलेल्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. तसंच निवडणूक आयोगाच्या सुनावणीदरम्यान अजित पवार यांच्यासाठी वापरण्यात आलेल्या भेकड या शब्दावरूनही पवार गटाला खडेबोल सुनावले. या पार्श्वभूमीवर आता शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी तटकरेंवर पलटवार करत प्रश्नांची सरबत्ती केली आहे.

ईडीच्या दबावातून अजित पवार यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी सत्तेत सामील होण्याचा निर्णय घेतला आणि आता शरद पवार यांच्याबाबतही हे लोक कृतघ्न झाल्याचा हल्लाबोल विकास लवांडे यांनी केला आहे. लवांडे यांनी याबाबत आपल्या 'एक्स' हँडलवर लिहिलेली ही पोस्ट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत हँडलवरून देखील रिपोस्ट करण्यात आली आहे.

तटकरेंची फटकेबाजी अन् विकास लवांडेंचे १० तिखट सवाल

"अजितदादा भेकड नाहीत, दिलेला शब्द पाळणारे  अजितदादा, प्रशासनावर वचक असणारे अजितदादा, भाजपसोबत सरकार आणि ४३ आमदारांचा पाठिंबा आणि घड्याळ तेच, वेळ नवीन....वगैरे वगैरे भाषणबाजी करणारे निवडणूक आयोगाकडे नोंदणी नसलेल्या गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब आपण माझ्या सामान्य प्रश्नांची उत्तरे द्याल का?" असं म्हणत विकास लवांडे यांनी सुनील तटकरे यांना हे प्रश्न विचारले आहेत.

काय आहे लवांडे यांचे प्रश्न?
 
१) अजितदादा भेकड नसते, खरंच हिंमत असती तर स्वतःचा नवा पक्ष स्थापन केला असता. पण तसे न करता पक्ष संस्थापक आदरणीय शरद पवारसाहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर कुणाच्या आधाराने हक्क दाखवत आहात? स्वाभिमानी अजितदादा दिल्लीपुढे का झुकले? EDला का घाबरले ? त्यांनी EDला मा. पवार साहेबांनी जसे आव्हान दिले होते, तसे जाहीर आव्हान का दिले नाही? तुम्ही सर्वजण भेकड की अटकेला घाबरले?

२) प्रशासनावर वचक असता तर प्रशासनातील प्रचंड भ्रष्टाचार,कामचुकारपणा कसा व का वाढला? जनतेचे जातीचे दाखले ते इतर योजनांची विविध स्तरावर कामे प्रलंबित का आहेत? झिरो पेंडंसी का नाही? मागील ४ महिन्यात कोणती सार्वजनिक महत्त्वाची कामे केलीत? मराठा आरक्षण मुद्यावर काय भूमिका बजावली? भुजबळांना पाठिंबा की मराठा आंदोलकांना पाठिंबा हे कधी सांगणार? 

३) सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजपा घेत नाही त्याला तुमचा पाठिंबा आहे का? कारण आधी अजितदादा सतत मागणी करत होते आत्ता गप्प का?

४) ४३ आमदारांची घेतलेली पाठिंब्याची प्रतिज्ञापत्र दिशाभूल करून आणि दबावाखाली घेतली की नाही? त्यांचा सर्वांचा एकत्रित फोटो, व्हिडिओ जनतेला का दाखवत नाही?
 
५) खोके सरकारमध्ये  अजितदादा DCM-2 आहेत, हे दादांचे प्रमोशन की डिमोशन आहे ? हा दादांचा स्वाभिमान की आणखी काय समजायचे ?
 
६) 'घड्याळ तेच वेळ नवीन' कुठून येतो इतका आत्मविश्वास? दिल्लीच्या अदृश्य शक्तीमुळेच ना? 

७) देशाच्या पंतप्रधानांनी भोपाळ सभेत जाहीरपणे केलेला ७० हजार कोटींच्या घोटाळ्याचा व भ्रष्टाचाराचा आरोप केला तो खरा की खोटा होता? त्याबाबत अधिकृत खुलासा कधी होईल? 

८) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आजपर्यंत भाजपाने जे जे विविध भ्रष्टाचाराचे आरोप केले होते ते कुणावर केले होते? पक्षाची कायमच बदनामी कुणामुळे होत होती? 

९) तुम्हाला सर्वांना अनेक वर्ष मंत्रिपदे मिळाली, सत्ता उपभोगायला मिळाली, निवडणुकीत मते मिळाली ती कुणामुळे? राज्यात तुमच्या सर्वांच्या हातात सत्ता व पक्ष होता तो पक्ष का वाढवला नाही ? लहान मोठे सर्वत्र ठेकेदार कुणी जपले होते ? 

१०) आपल्याला राजकीय पटलावर ज्यांनी मोठी ओळख निर्माण करून दिली त्या आदरणीय शरद पवार साहेबांच्या बाबत कृतज्ञता व्यक्त करता येत नसेल तर किमान कृतघ्नपणा तरी का करता?

दरम्यान, शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी उपस्थित केलेल्या या प्रश्नांना अजित पवार गटातील एखाद्या नेत्याकडून प्रत्युत्तर दिलं जातं का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Web Title: If Ajit Pawar is not a coward why did he not form his own party 10 questions from Sharad Pawar group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.