'अजित पवारांना मुख्यमंत्री केले, तर 4 दिवसांत राज्य विकतील'; पडळकरांचा खोचक टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2021 05:15 PM2021-12-22T17:15:28+5:302021-12-22T17:18:15+5:30
'घोटाळ्यात तुमचेच लोक सामील असतील, तर पोलीस चौकशी कशी करणार?'
मुंबईः आजपासून विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. पहिल्या दिवसापासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले आहे. आज भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी अजित पवारांना मुख्यमंत्री पदाचा चार्ज दिला, तर ते 4 दिवसांत राज्यच विकून मोकळे होतील, अशी टीका केली. यामुळे आता वाद वाढण्याची शक्यता आहे.
सीबीआय चौकशीची मागणी
यावेळी बोलताना पडळर म्हणाले की, अजित पवारांना जर मुख्यमंत्री पदाचा चार्ज दिला, तर हे अधिवेशन संपायच्या आत चार दिवसांत ते राज्यच विकून मोकळं होतील, अशी टीका केली. तसेच, राज्यातील परीक्षांच्या घोळावरुनही सरकारवर निशाणा साधला. राज्यात विद्यार्थी फक्त भाजपचेच आहेत का? प्रत्येक ठिकाणी लाखोंचे आकडे येत आहेत.
हे प्रकरण आता थेट मंत्रालयापर्यंत पोचतंय. हे सारं सरकारच्या आशीर्वादानं होतंय. या घोटाळ्यात तुमचेच एवढी लोक यात सामील असतील, तर पोलीस चौकशी कशी करणार ? सीबीआय चौकशी केली, तर बिघडलं कुठं, तुम्ही काही केलं नाही, तर भीती कसली, करू द्या ना सीबीआय चौकशी, अशी मागणीही त्यांनी केली.
काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील ?
मुख्यमंत्री पदाचा चार्ज या विषयाला आज सकाळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तोंड फोडले. मुख्यमंत्र्यांचा जर पक्षातील कोणाकडे विश्वास नसेल, तर रश्मी वहिनींना चार्ज देवून त्यांना मुख्यमंत्री करता येऊ शकता. त्यांना मंत्री म्हणून सामील करून घ्या. आदित्य ठाकरेंनाही ते चार्ज देवू शकतात. मात्र, त्यांचा बहुदा मुलावरही विश्वास नसेल. त्यामुळेच ते त्यांच्याकडे चार्ज देत नाही, अशी टिका त्यांनी पाटलांनी केली होती.
अमृता फडणवीसांना विरोधी पक्षनेत्या करणार का?
पाटील यांच्या टिकेला महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रत्युत्तर दिले. रश्मी ठाकरे या कधीच लाईमलाईटमध्ये नसतात. अमृता फडणीवस लाईमलाईटमध्ये असतात त्यांना तुम्ही विरोधी पक्षनेत्या करणार का हे आधी सांगा. एकवेळ आदित्य ठाकरे हे मंत्री आहेत म्हणून त्यांचं नाव घेणं किंवा अन्य कोणाचं हे ठीक आहे. पण रश्मी ठाकरेंचं नाव का घेता. त्या कधीच यात नसतात. महाराष्ट्राचं राजकारण अजून किती खाली आणणार. महिलांचं हनन करणं ही हिंदू संस्कृती नाही, असं पेडणेकर म्हणाल्या.