अजित पवारांनी सांगितलं तर उमेदवारी मागे घेणार का?; नवाब मलिक म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2024 02:55 PM2024-10-31T14:55:57+5:302024-10-31T14:57:27+5:30
Nawab Malik Mahayuti News: नवाब मलिकांना अजित पवारांनी उमेदवारी दिल्याने महायुतीतील भाजप आणि शिवसेनेची विरोधकांकडून कोंडी केली जात असल्याचे दिसत आहे.
Nawab Malik Latest news: अजित पवारांनी विरोध झुगारून नवाब मलिकांना दिलेली उमेदवारी महायुतीत कळीचा मुद्दा बनली आहे. भाजपकडून नवाब मलिकांवर गंभीर आरोप केलेले आहेत. त्यामुळे भाजपने मलिकांविरोधात भूमिका घेतली आहे. अजित पवारांनी निर्णयाचा पुनर्विचार करण्याची भूमिका महायुतीतील मित्रपक्षाकडून केली जात आहे. याचबद्दल नवाब मलिकांना विचारण्यात आले.
नवाब मलिक हे त्यांच्या नेहमीच्या म्हणजे अणुशक्तीनगर मतदारसंघातून न लढता, यावेळी शिवाजीनगर मानखुर्द विधानसभा मतदारसंघातून लढत आहेत. टीव्ही९ वृत्तवाहिनीशी बोलताना नवाब मलिकांनी उमेदवारीबद्दल भाष्य केले. भाजपने प्रचार करण्यास नकार दिला आहे. देवेंद्र फडणवीस, आशिष शेलारांनी तशी स्पष्ट भूमिका मांडली आहे.
'माझा प्रचार करू नका'
त्यावर बोलताना नवाब मलिक म्हणाले, "माझा प्रचार करू नका. मी राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार आहे. मी आग्रह धरत नाहीये की, तुम्ही प्रचारला या. जे माझं नाव दाऊदशी जोडतात, त्यांच्यावर मी कायदेशीर कारवाई करणार आहे", असा इशारा त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजप नेत्यांना दिला.
अजित पवारांनी अर्ज मागे घ्यायला सांगितलं, तर...
नवाब मलिका यांनी शिवाजीनगर मानखुर्द विधानसभा मतदारसंघातून दोन अर्ज भरले आहेत. एक अर्ज अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून तर दुसरा अपक्ष उमेदवार म्हणून भरला आहे.
अजित पवारांनी उमेदवारी अर्ज मागे घ्या असं सांगितलं, तर ऐकणार का? या प्रश्नाला उत्तर देताना नवाब मलिक म्हणाले, "तुम्हाला कायदेशीर प्रक्रिया समजून घ्यावी लागेल. आता कोणी उमेदवारी मागे घेऊ शकत नाही. तो अधिकार माझा नाही."
"कोणी सांगितलं की हा आमचा उमेदवार नाहीये, तर तशी परिस्थिती होऊ शकत नाही. राष्ट्रवादीनेच मला एबी फॉर्म दिला आहे. माझ्यावर विश्वास टाकला आहे. भाजप विरोधात असली, तरी मी राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आणि जिंकून येणार", असे उत्तर नवाब मलिकांनी दिले.