मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या अंतर्गत सर्व्हेतील आकडेवारी समोर आली असून ही आकडेवारी काँग्रेस-राष्ट्रवादीसह शिवसेनेचे टेन्शन वाढविणारी आहे. पक्षाच्या अंतर्गत सर्व्हेत भाजपला १६० जागा दाखविण्यात आल्या आहेत. सहाजिक या जागा बहुमतापेक्षा अधिक आहे. त्यामुळे भाजप-शिवसेना युतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असून भाजपकडून कार्यकर्त्यांना तशा सूचना देण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. भाजपची वाढलेली ताकद राष्ट्रवादी-काँग्रेसप्रमाणेच मुख्यमंत्रीपदाचा दावा सांगणाऱ्या शिवसेनेसाठी चिंतेची बाब आहे. त्यामुळे युती तुटल्यास भाजपला रोखण्याचे आव्हान आघाडीसह शिवसेनेसमोर उभे राहणार आहे.
अंतर्गत सर्व्हेत भाजपला १६०, शिवसेनेला ९० आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला ३८ जागा दाखविण्यात आल्या आहेत. तर भाजप-शिवसेना एकत्र लढल्यास या जागा २३० पर्यंत जाण्याची शक्यता आहे. तर आघाडीला ५८ जागा दाखविण्यात आल्या आहेत. त्यामुळे सहाजिकच भाजपला स्वबळावर लढणे फायद्याचे ठरणार आहे. अर्थात, युती केल्यास, भाजपच्या वाट्याला केवळ १४४ जागा येतील. त्यातही महायुतीतील घटक पक्षांना काही जागा सोडाव्या लागतील. त्यामुळे सर्वच्या सर्व जागा निवडून आल्या तरी भाजपला बहुमत मिळणार नाही हे निश्चित आहे. अशा स्थितीत एकत्र लढून सरकार स्थापन करणे भाजपसाठी सोयीस्कर ठरू शकते.
लोकसभा निवडणुकीपूर्वीच भाजप आणि शिवसेनेची युती ठरलेली आहे. लोकसभेला उभय पक्ष एकत्रच सामोरे गेले होते. त्यात दोन्ही पक्षांना चांगले यशही मिळाले. त्यावेळी विधानसभेलाही युती राहणार हे निश्चित कऱण्यात आले होते. परंतु, राज्यातील बदलेली स्थिती भाजपच्या पथ्यावर पडणारी आहे. त्यातच शिवसेनेकडून मुख्यमंत्रीपदासाठी जोर लावण्यात येत आहे. त्यामुळे शिवसेना देखील स्वबळाचा नारा देण्याची शक्यता आहे.
सर्व्हेनुसार शिवसेना बहुमतापासून दूर आहे. प्रत्यक्षात तसा निकाल लागल्यास, शिवसेनेला विरोधकांच्या भूमिकेत राहावे लागले. त्यामुळे युती तुटल्यास, राज्यात भाजपला रोखण्याचे आव्हान राष्ट्रवादी-काँग्रेससह शिवसेनेसमोर असणार आहे.