सोलापूर : आघाडीचे सरकार टिकवायचे असेल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सर्वांनी साथ द्यावी. आगामी सर्वच निवडणुका या एकत्र लढण्याचा विचार सुरू असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात बोलताना पवार म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार टिकवायचं असेल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बळ देण्यासाठी हातात हात घालून सर्वांनी काम करावे. ऊस उत्पादकांना बिल देण्यासाठी जुनी पद्धत योग्यच आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांवर काल आयकर विभागाच्या पथकांनी छापे टाकले. या छाप्यांवरून पवारांनी सोलापुरात केंद्र सरकारवर टीका केली.
लोक भाजपला पुन्हा धडा शिकवतील
पवार म्हणाले, मला काही लोकांनी चिठ्ठ्या पाठविल्या की, अजित पवार यांच्याकडे सरकारने काही पाहुणे पाठविले हाेते. आपल्याला पाहुण्यांची चिंता नसते. विधानसभा निवडणुकीच्या आधी ईडीने मला एका बँकेच्या प्रकरणात नोटीस पाठविली होती. मला त्यांनी ईडीची नोटीस दिली. महाराष्ट्रातील लोकांनी भाजपला येडे ठरविले. अजित पवार यांच्याबद्दल आता त्यांनी काही गोष्टी केल्या असतील. सत्तेचा गैरवापर केल्याबद्दल महाराष्ट्रातील लोक भाजपला पुन्हा धडा शिकवतील.
हाच आमचा मुख्यमंत्री म्हणून ठाकरे यांचा उचलला हात!
विधानसभा निवडणूक झाल्यानंतर सरकार स्थापनेवेळी निर्माण झालेल्या स्थितीची आठवण शरद पवार यांनी सांगितली. १०६ आमदारांवर भाजपने सरकार स्थापनेचा दावा केला अन् आमच्या ५४ आमदारांची पळापळ सुरू होती. काँग्रेस, सेनेसोबत बैठक घेतली. सर्वजण थंड डोक्याने बसलेले असतानाच शेजारी बसलेले उद्धव ठाकरे यांचे हात उंचावून हाच आमचा मुख्यमंत्री असे म्हणताच महाराष्ट्र स्तब्ध झाला होता. कुठे गेल्यावर कामे होतात हे कार्यकर्त्यांना माहिती झाले आहे. हे सरकार आपल्याला टिकवायचं आहे.
बंदमध्ये सर्व पक्षांनी सहभागी व्हावेउत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी येथे निदर्शने करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगावर भाजप नेत्यांनी गाड्या घातल्या. त्यात ८ लोक मारले गेले. या घटनेच्या निषेधार्थ ११ ऑक्टोबरला ‘महाराष्ट्र बंद’ पुकारला आहे. भाजपविरुद्धच्या या बंदमध्ये सर्वपक्षियांनी सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावेळी केले.