अकोला : लोकसभा निवडणुकीत कॉँग्रेसपेक्षा राष्ट्रवादी कॉँग्रेसची ताकद वाढली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत सन्मानजनक जागा वाटप न झाल्यास स्वबळावर निवडणूक लढविण्याचा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी अकोल्यात आयोजित निर्धार मेळाव्यात दिला. यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) जयदत्त क्षीरसागर, अमरावती विभागाचे प्रभारी आ. ख्वाजा बेग आदी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री पवार यांनी केंद्र सरकारवर टीका करीत शेतमालावरील आधारभूत किंमत अत्यल्प वाढविले असल्याचे सांगितले. मोदी सरकारने जनतेचा अपेक्षाभंग केला असून, या फसवेगिरीला जनता उत्तर देईल. भाजप नेते ह्यखोटं बोलावं पण रेटून बोलावं,ह्ण या उक्तीप्रमाणे वागत असल्याचा आरोप त्यांनी केला. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी ५ रुपयात मुंबईत जेवण मिळत असल्याच्या वक्तव्याचा समाचारही पवार यांनी घेतला. जनतेने दिलासा मिळावा, यासाठी मोदी सरकार निवडून दिले. मात्र देशात दिवसेंदिवस महागाई वाढतच असून, पेट्रोल, डिझेल, सिमेंट, खते, बियाणे यांचेही भाव गगनाला भिडत आहेत. १९७७ मध्ये इंदिरा गांधीचे सरकार भुईसपाट झाले. मात्र, नंतर लगेच १९८0 मध्ये पुन्हा इंदिरा गांधी यांनी सरकार स्थापन केले, याची आठवणही पवार यांनी करून दिली. विहिंपचे प्रवीण तोगडिया यासारखे नेते भावना भडकविण्याचे काम करीत असून, सरकार समाजात फूट पाडत असल्याचा आरोप पवार यांनी केला. दिल्लीतील महाराष्ट्र सदनात ह्यरोजाह्ण तोडल्याच्या कथित घटनेचाही पवार यांनी समाचार घेतला. प्रत्येकाने एकमेकांच्या धर्माचा आदर करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्याने ह्यआपह्णचा दिल्लीतच नव्हे तर महाराष्ट्रातही दारुण पराभव झाला, असेही ते म्हणाले.
जागा वाटप सन्मानाने न झाल्यास विधानसभा निवडणूक स्वबळावर !
By admin | Published: August 04, 2014 12:51 AM