मराठा समाजाला ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाचा आज सातवा दिवस आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांची प्रकृती गंभीर झालेली आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. मनोज जरांगे पाटील यांची तब्येत महत्वाची आहे, त्यांच्या प्रकृतीला काय झाले तर जबाबदार कोण? अशी विचारणा पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.
लोणावळ्यामध्ये काँग्रेसचं दोन दिवसीय राज्यस्तरीय शिबीर सुरू आहे. या शिबिरामध्ये बोलताना मराहाष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, राज्य सरकारने मागीसवर्गीय आयोगाचा अहवाल आत्ताच्या आता एका तासात वेबसाईटवर टाकून सार्वजनिक करावा आणि दोन तासाच्या आत अध्यादेश काढावा. अध्यादेश काढण्यास अधिवेशनाची गरज नाही तो पास करण्यास अधिवेशन लागते. आयोगाच्या अहवालात काय आहे महाराष्ट्राच्या जनतेला व जरांगे पाटील यांनाही कळले पाहिजे, त्यासाठी दोन दिवसांची वाट पाहण्याची गरज काय? अशी विचारणा पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
तसेच उपोषण करत असलेल्या मनोज जरांगे पाटील प्रकृतीबाबतही पृथ्वीराज चव्हाण यांनी चिंता व्यक्त केली. मनोज जरांगे पाटील यांची तब्येत महत्वाची आहे, त्यांच्या प्रकृतीला काय झाले तर जबाबदार कोण? मुख्यमंत्री शिंदे व मनोज जरांगे पाटील यांची बोलणी झाली, उपोषण सोडले, गुलाल उधळला व प्रश्न सुटला, असे सांगितले. मग पुन्हा उपोषण करण्याची गरज काय पडली याची उत्तरे दिली पाहिजेत, असेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.