मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीत मनसेनं सोबत यावा यासाठी महायुतीकडून प्रयत्न सुरू आहे. त्यात मुंबईतील एक जागा मनसेला सोडण्याची तयारी महायुतीनं केली आहे. सध्या यावर चर्चा सुरू आहे. त्यातच बाळा नांदगावकर हे दिल्लीत खासदार म्हणून गेले तर महाराष्ट्र सैनिकांना आनंदच होईल असं सूचक विधान मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केले आहे.
मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले की, लोकसभेची तयारी आम्ही २ वर्षापासून करतोय. राज ठाकरेंनी नुकतेच ३ मतदारसंघातील आढावा बैठक घेतल्या. संघटना बांधणीबाबत मार्गदर्शन केले. लोकसभेला किती जागा लढवायच्या की नाही याबाबत चर्चा सुरू आहे. भाजपा-शिवसेना यांच्यासोबत विचारधारेत काही फरक नाही. त्यांच्यासोबत युती करायची की नाही याबाबत राज ठाकरे ठरवतील. बाळा नांदगावकर हे खासदार म्हणून दिल्लीत गेले तर महाराष्ट्र सैनिकांना आनंदच होईल. ते महायुतीतून जातील की मनसे तिथे निवडणूक लढवेल याबाबत निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील. बाळा नांदगावकर खासदार झाले तर आनंदच आहे. राज ठाकरे जो आदेश देतील तो आम्ही मानणारे आहोत. आमची लोकसभेची तयारी सुरू आहे. साहेब जो निर्णय देतील त्यानुसार आम्ही काम करू असं त्यांनी म्हटलं.
तसेच अमेय खोपकर यांनी कॅफे उघडला तिथे भेट द्यायला उदय सामंत आले होते. तिथे आमची युतीवर चर्चा झाली नाही. राजकीय घडामोडींवर चर्चा झाली. युतीची बोलणी काही सुरू आहेत का, असतील तर काय सुरू आहेत हे माहिती नाही. बाळा नांदगावकर खासदार झालेत तर आम्ही आनंदीच होऊ असंही संदीप देशपांडे यांनी म्हटलं.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे हे राज ठाकरेंना भेटायला येतात, त्यादृष्टीने आमची काही दिवसांपूर्वी बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई यांच्यासोबत शिष्टमंडळ सदिच्छा भेटीसाठी फडणवीसांना भेटले. दोन्ही पक्षाचे एकमेकांसोबत समन्वय असलेला चांगला असतो. त्यामुळे ही भेट झाली. भविष्यात काय होईल हे आज सांगता येत नाही असंही देशपांडे यांनी सांगितले आहे.