मुंबई - बाळासाहेबांनी आम्हाला दिशा दिली, गुरू हा मोकळ्या हाताने देत असतो. बाळासाहेबांनी मोकळ्या हाताने सर्वांना दिले. असा गुरू होणे नाही. महाराष्ट्राचे आणि देशाचे गुरू बाळासाहेब होते. प्रत्येक दिवशी बाळासाहेबांचे स्मरण होते. आजच्या दिवशी विशेष होतंय. काही जणांनी शिवसेनेच्या बाहेर जाऊन बाळासाहेबांची शिवसेना केली. आज बाळासाहेब हयात असते तर त्यांनी त्यावर काय भाष्य केले असते हे समजून घेण्यासारखं आहे. आम्ही एकनिष्ठेने राहू ही खरी गुरुदक्षिणा आहे अशा शब्दात खासदार संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांवर टीकास्त्र सोडलं आहे.
संजय राऊत म्हणाले की, बाळासाहेब आमच्यासाठी ब्रह्मा, विष्णू महेश होते, एक तेजस्वी नेते होते. बाळासाहेंनी निष्ठेच्या बंधनात सगळ्यांना बांधून ठेवले होते. ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंना सोडले ते बाळासाहेब आमचे गुरू आहेत असं सांगतात. ज्यांची ज्यांची शिवसेनेवर निष्ठा आहे या सगळ्यांचे गुरू बाळासाहेब ठाकरे आहेत. बाळासाहेबांनी बंडखोरांना त्यांच्या स्टाईलने उत्तर दिले असते असं त्यांनी सांगितले.
त्याचसोबत भाजपानं शिवसेनेवर केलेल्या टीकेचाही राऊतांनी समाचार घेतला. राज्यपालांना पत्र लिहिणं शिवसेनेचा रडीचा डाव आहे असं भाजपानं म्हटलं होते त्यावर रडीचा डाव आहे मग तुम्ही कोर्टात का गेला? कोर्टाने काय निर्णय दिला हे राज्यपालांना कळवणं आमचं काम आहे असं म्हणत राऊतांनी भाजपाच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले.
आता सगळ्यांच्याच हातात खंजीरसध्या शिवसेनेचे नेते संजय राऊत विविध प्रभागात जाऊन पदाधिकाऱ्यांची भेट घेत आहे. यावेळी संजय राऊत यांनी पुन्हा बंडखोर आमदारांवर निशाणा साधला आहे. हे भविष्यात कळेलच की कुणाला कुणापासून धोका आहे. आम्हाला कुणापासूनही धोका नाही. जे व्हायचं होतं, ते होऊन गेलं, असं संजय राऊत यांनी सांगितलं. भविष्यात कुणीही राजकारणात स्वत:ला सुरक्षित समजू नये. आता सगळ्यांच्याच हातात खंजीर आहेत. त्यामुळे आता प्रत्येकाला प्रत्येकापासून धोका आहे, असं इशारा देखील संजय राऊत यांनी यावेळी दिला.