भाजप पुन्हा सत्तेवर आल्यास संविधान शिल्लक राहिल का ?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2018 09:28 PM2018-08-20T21:28:51+5:302018-08-20T21:29:43+5:30
भारतीय जनता पक्षाची सध्याची वाटचाल बघता ते पुन्हा सत्तेवर आल्यास संविधान शिल्लक राहील का अशी शंका असल्याचे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुण्यात मांडले.
पुणे : भारतीय जनता पक्षाची सध्याची वाटचाल बघता ते पुन्हा सत्तेवर आल्यास संविधान शिल्लक राहील का अशी शंका असल्याचे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुण्यात मांडले.
यावेळी व्यासपीठावर खासदार कुमार केतकर, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण उपस्थित होते. यावेळी चव्हाण यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेवर भाष्य केले.ते म्हणाले की, 'राजीव गांधी यांनी अर्थव्यवस्थेच्या उदारीकरणाचा पाया घातला, लायसन्स राज मोडीत काढले. १९९१ चा कॉग्रेस पक्षाचा जाहीरनामा ही राजीव गांधी यांची मूळ संकल्पना होती. नरसिंहराव यांनी जो जाहीरनामा राबवला, त्याची मूळ संकल्पना राजीव गांधी यांची होती. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेतील सुधारणांचे जनक राजीव गांधी होते.सर्वात जास्त वार्षिक विकास दर १९८८ मध्ये १०.२ टक्के होता. मोदी सरकारने योजना आयोग बंद करून टाकला. त्याऐवजी नीती अयोग आणला. सर्वात यशस्वी पंचवार्षिक योजना गांधी यांनी राबवली.
कुमार केतकर म्हणाले की, राजीव गांधी यांची १९९१ मध्ये हत्या झाली तेव्हा संगणक केवळ ११ वर्षांचा होता, गुगलचा जन्मही झाला नव्हता. देशाला संगणकाची गरज नाही, त्यामुळे देशात बेरोजगारी येईल, अशी ओरड भाजपचे नेते करत होते. आता तेच नेते आपणच मोबाईल, संगणक क्रंती केली, असा अविर्भाव आणतात.
अशोक चव्हाण म्हणाले की, देशाच्या आर्थिक विकास दरामध्ये सातत्याने घसरण होत आहे. निर्यात बंद झाल्याने गुंतवणूक नाही, रोजगार नाही. मोदी सरकाच्या काळात केवळ योजनांचा कारखाना चालू आहे. जाहिरातबाजीमुळे सामान्यांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. तरुणाई चुकीच्या दिशेने भरकटत आहे. नेमके काय चालले आहे, खरे काय, खोटे काय, असा संभ्रम निर्माण झाला आहे.
ठळक मुद्दे :
आघाडी सरकारच्या काळात मिहान, भारत डायनमिक्स, भारत हेवी इलेक्ट्रिकल अशा अनेक प्रकल्पांचे भूमिपूजन केले. फडणवीस सरकारच्या काळात केवळ मेक इन इंडियाची घोषणाबाजी केली.
मुद्रा योजनेत 7.28 कोटी लोकांना नोकर्या मिळाल्या - अमित शाह, नोकऱ्या आहेत, आकडेवारी नाही - मोदी, नोकऱ्या आहेत कुठे- गडकरी
2015 सालात सर्वाधिक 4291 शेतकऱ्यांच्या आत्महत्या
निवडणुकीला सामोरे जाताना धार्मिक, जातीय ध्रुवीकरण होईल
आघाडी होऊ नये यासाठी साम, दाम दंड भेद आणि पैशांचा अमाप वापर होईल
कुमार केतकर :
मोदी हेच देशाला तारू शकतात, हा समज सर्वदूर पसरला आहे. पुन्हा मोदींची सत्ता आली तर २६ मे २०१४ किंवा ६ डिसेंम्बर १९९२ हे स्वातंत्र्यदिन म्हणून घोषित झाले तर आश्चर्य वाटायला नको.