लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मला भाजपमध्ये डावलले जात असल्याचा समज लोकांमध्ये आहे; हे जाणीवपूर्वक होत असल्याचेही लोकांना वाटते. तसा समज होऊ नयेे म्हणून मी प्रयत्न करते, तसाच प्रयत्न भाजप पक्षश्रेष्ठी करतील किंवा हा समज बदलण्याचा ते प्रयत्न करतील, अशी अपेक्षा आहे, या शब्दात भाजपच्या नेत्या आणि राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी लोकमत डिजिटलचे संपादक आशिष जाधव यांना दिलेल्या मुलाखतीत मन मोकळे केले.
परळीची जागा भाजपने धनंजय मुंडेंसाठी सोडली तर? मी परळी सोडण्याचा प्रश्न नाही. मला पक्ष विचारेल, ही माझी अपेक्षा आहे. कारण परस्पर निर्णय घेण्याची पक्षाची संस्कृती नाही.
भाजपमध्ये आपल्याला डावलले जात आहे का? वंजारी समाजातील इतरांना पर्याय म्हणून प्रस्थापित केले जात असल्याचे आपल्याला वाटते का? पंकजा मुंडे - मी यावर कधीही भाष्य केलेले नाही. पण, लोकांना तसे वाटते. माझ्या बाबतीत जे झाले ते चांगले झाले नाही, असे केवळ माझ्या समाजातीलच नाही तर अन्य समाजाच्या लोकांनाही वाटते, ते माझ्याशी तसे बोलतात. असा समज आहे, तर तो दुरुस्त करण्याची गरज आहे. मुंडे साहेबांनी पक्षासाठी मोठे योगदान दिले हे खरेच आहे. पण, मला त्यांच्या वलयाने काहीही नको आहे. मी पक्षासाठी जे योगदान दिले, त्याचे मूल्यांकन व्हावे, असे लोकांना वाटते.
भाजपशिवाय दुसरा पर्याय आपण स्वीकारणार आहात का? तशी ऑफर सिरिअसली आली का? मुंडे - या क्षणाला कोणताही नवा प्रयोग करण्याची माझी इच्छा नाही. मध्यंतरीच्या घटनाक्रमानंतर मी स्वत:ला प्रस्थापित करू शकले असते, मंत्रीही होऊ शकले असते. मी यांना भेटले, त्यांना भेटले, या पक्षात जाणार वगैरे बऱ्याच बातम्या दिल्या गेल्या. पण, माझ्या मनाला तसा कोणताही विचार शिवलेला नाही. ती वेळ माझ्यावर येऊ नये, अशी मी प्रार्थना करते.
प्रदेश भाजप कोअर कमिटीमध्ये आपण आजही आहात का? मुंडे - मी कोअर कमिटीत आहे का? वर्षदीड वर्षात मी जाऊ शकलेले नाही. मध्य प्रदेशची जबाबदारी असल्याने जमले नाही.
लोकसभेची निवडणूक लढायचा पक्षाने आदेश दिला तर आपली भूमिका काय असेल? धनंजय मुंडे आणि आपण एकत्र येणार का?मुंडे - मी केंद्रात जाण्याची वेळ आली आहे का, हे मी सांगू शकत नाही. दोनवेळा प्रीतम तिथे खासदार आहे, ती चांगले काम करते, तिलाच काय पक्षाच्या स्थापित कोणत्याही नेत्याला डावलून मला काहीही नको आहे. धनंजय आणि माझ्याबाबत सांगायचे तर आम्ही आमचा कौटुंबीक विषय सौम्यतेकडे, सहमतीकडे नेत आहोत.
भगवान गडावरील दसरा मेळाव्यात आपण काय बोलणार?मुंडे - माझे त्या मेळाव्याशी भावनिक नाते आहे. काय बोलायचे ते मी ठरविलेले नाही.