नवी दिल्ली- नारायण राणे यांना भाजपाच्या विचारधारेनुसार काम करणं शक्य असेल तर त्यांना पक्षात घेण्याबाबत नक्की विचार केला जाईल, अशी सूचक प्रतिक्रिया सोमवारी भाजपाच्या महाराष्ट्र प्रभारी सरोज पांडे यांनी दिली आहे. दिल्लीत आज भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आहे. या बैठकीनंतर नारायण राणे भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेणार असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर बैठकीला जाण्यापूर्वी सरोज पांडे यांना नारायण राणे यांच्या भाजपा प्रवेशाबाबत विचारण्यात आलं.
नारायण राणे यांना भाजपाच्या विचारधारेवर विश्वास आहे का? भाजपाच्या पद्धतीने काम करणं त्यांना शक्य आहे का? तसं असेल तर त्यांना पक्षात घेण्याबाबत निश्चित विचार केला जाईल. पण याबाबतचा अंतिम निर्णय भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहाच घेतील, असं सरोज पांडे यांनी सांगितलं आहे. त्यामुळे अमित शहा आणि नारायण राणे यांच्या आजच्या भेटीत नेमकं काय साध्य होतं, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
आज शहा-राणेंची भेट
विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा देऊन काँग्रेसमधून बाहेर पडलेले ज्येष्ठ नेते नारायण राणे दिल्लीमध्ये भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेणार आहेत. नारायण राणे काही वेळापूर्वीच दिल्लीमध्ये पोहचले असल्याचं समजतं आहे. दिल्लीत भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक तालकटोरा स्टेडियममध्ये पार पडली. या बैठकीला भाजपाशासित राज्यांचे मुख्यमंत्री, सर्व प्रदेशाध्यक्ष उपस्थित होते. बैठकीचे उद्घाटन राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केलं असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाने या बैठकीचा समारोप होणार आहे. ही बैठक संपल्यानंतर राणे हे अमित शहा यांची भेट घेणार असल्याचं समजतं आहे. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेही उपस्थित असतील. या दिल्लीवारीत राणेंचा भाजपाप्रवेश निश्चित झाला, तरी घोषणा मात्र ते मुंबईत पत्रपरिषद घेऊनच करतील, असं सूत्रांकडून समजतं आहे.
नारायण राणेंनी दिला कॉंग्रेसचा आणि आमदारकीचा राजीनामा
नारायण राणे यांनी अखेर कॉंग्रेस पक्षाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला. कुडाळमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधीसह सर्वच ज्येष्ठ नेत्यांवर जोरदार तोफ डागली. महाराष्ट्र काँग्रेसचा अध्यक्ष होण्याची कोणतीही पात्रता अशोक चव्हाणांमध्ये नसतानाही ते प्रदेशाध्यक्ष आहेत असं म्हणत त्यांनी महाराष्ट्रातील कॉंग्रेसचं दुकान लवकरच बंद होणार असल्याचा दावा केला. 48 जणांनी नारायण राणेंना मुख्यमंत्री करा,असं सांगूनही माझं नाव घोषित न करता अशोक चव्हाणांचं नाव जाहीर केलं. अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा बट्याबोळ केला आहे. महाराष्ट्रातील कॉंग्रेसचं दुकान लवकरच बंद होणार असून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातून अनेक जण काँग्रेस सोडतील असं राणे यावेळी म्हणाले .