मुंबई : मांसाहारी ग्राहकांना घर नाकारणाऱ्या विकासकांच्या इमारतींचा पाणीपुरवठा बंद करण्यास महापालिकेने असमर्थता दर्शविली आहे. याउलट घर नाकारल्यास पोलिसांकडे तक्रार करा, असा सल्ला त्या कुटुंबांना देत पालिका प्रशासनाने आपली जबाबदारी झटकली आहे.मांसाहारी कुटुंबांना मुंबईत काही ठिकाणी विकासक फ्लॅट विकण्यास नकार देत आहेत. असे अनेक धक्कादायक प्रकार पुढे आल्यानंतर अशा विकासकांच्या इमारतींचे बांधकाम सुरू करण्याचे प्रमाणपत्र रद्द करावे किंवा पाणीपुरवठा बंद करण्याची मागणी ठरावाच्या सूचनेद्वारे मनसेचे तत्कालीन गटनेते संदीप देशपांडे यांनी पालिका प्रशासनाकडे केली होती. या ठरावाच्या सूचनेला भाजपा वगळता सर्वच राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला.पालिकेच्या महासभेत हा ठराव मंजूर करून प्रशासनाकडे अभिप्रायासाठी पाठविण्यात आला होता. मात्र बांधकामांना इमारत प्रस्ताव विभागामार्फत तांत्रिक मुद्द्यावर परवानगी दिली जाते. तसेच विकास नियंत्रण नियमावलीत अशा प्रकारच्या कारवाईची तरतूद नाही. त्यामुळे अशी कारवाई करता येत नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले होते. मात्र सुधार समितीमध्ये हा अहवाल फेटाळून लावत फेरविचारासाठी पुन्हा प्रशासनाकडे पाठविण्यात आला होता. (प्रतिनिधी)
मांसाहारींना घर नाकारल्यास पोलिसांकडे जा
By admin | Published: April 25, 2017 1:54 AM