जर छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडली नसती तर ते मुख्यमंत्री झाले असते, असे विधान शिवसेना (ठाकरे गट) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे. एढेच नाही,तर सरकार वाचवण्यात ते किती वाकबगार आहेत, हे तुम्ही आत्ता मला सांगत आहात, असेही ठाकरे अजित पवार यांना उद्देशून म्हणाले. ते मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या पंच्च्याहत्तरीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी भुजबळांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला. उद्धव ठाकरे म्हणाले, "प्रत्येकाचेच वय वाढत असते. पण बाळासाहेब सांगायचे वयाने माणूस मोठा होत असतो. पण ज्याक्षणी तो विचारांनी थकतो तो वृद्ध होतो. त्यामुळे छगन भुजबळ असो, फारुक अब्दुल्ला असोत किंवा मग शरद पवार अजूनही तरुण मनाची माणसे आहेत. नुसते तरुण मनाचे असून चालत नाही. तुमच्या मनात जिद्द असावी लागते एक इच्छा असावी लागते. ती या माणसांमध्ये आहे", असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.एकनाथ शिंदे यांना थेट आव्हान -यावेळी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही थेट आव्हान दिले, "प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला कोर्टात जावे लागतेय. मैदानासाठी कोर्टात जा, उमेदवारीसाठी कोर्टात जा. अरे हिंमत असेल तर मैदानात या. माझी तर तयारी आहे. मी मैदानात उतरलेलो आहे. आम्हाला मैदान कसे मिळणार नाही याची तयारी करण्यापेक्षा, एकाच व्यासपीठावर समोरासमोर येऊ आणि होऊन जाऊ देत काय व्हायचे ते," असे ठाकरे यांनी म्हणाले. तसेच, नियतीच्या मनात काय असते कल्पना नाही. कदाचित, आता मर्द लोकांच्या हातात मशाल देण्याची आवश्यकता आहे, असेच तिच्या मनात असेल, असेही ते म्हणाले.
Uddhav Thackeray : ...तर छगन भुजबळ मुख्यमंत्री झाले असते, उद्धव ठाकरेंनी सांगितला किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2022 5:43 PM