मुंबई : राज्यात महायुतीची सत्ता आल्यास आघाडी सरकारने निवडणुकीच्या तोंडावर घेतलेले निर्णय आणि काढलेले टेंडर रद्द करण्यात येतील, असे भाजपाचे ज्येष्ठ नेते खा. गोपीनाथ मुंडे यांनी बुधवारी सांगितले. भाजपाच्या विस्तारित प्रदेश कार्यकारिणीची बैठक झाल्यानंतर पत्रपरिषदेत ते म्हणाले की, पनवेल ते सायन मार्गाच्या टोलचे टेंडर काढण्याची तयारी शासन करीत आहे. ते काढू नये, अशी मागणी करून मुंडे म्हणाले की, शासनाने अलीकडे राज्यातील टोलची जी दरवाढ केली आहे, ती तातडीने रद्द करावी. राज्याच्या नगरविकास विभागाने मुंबई, पुणे परिसरातील बिल्डरांच्या १८२ फाइल्स अलीकडे मंजूर केल्या. त्यात जागांची आरक्षणे बदलण्यात आली, असा आरोप करून मुंडे म्हणाले की, याबाबतचा तपशील शासनाने जाहीर करावा. नाहीतर आम्ही तो जाहीर करू आणि आंदोलनदेखील करू. राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या पराभवावर कितीही पैजा लावल्या तरी आपण बीडमधून नक्कीच जिंकू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आजच्या प्रदेश बैठकीला विधानसभेचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे, सर्व उमेदवार, पदाधिकारी आदी उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)
युती सत्तेत आल्यास ते टेंडर रद्द
By admin | Published: May 15, 2014 2:38 AM