विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठीची शेवटची तारीख जवळ येत आली तरी महाविकास आघाडीमधील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. महाविकासआघाडीतील तिन्ही पक्षांनी आपापल्या उमेदवारांच्या याद्या प्रसिद्ध केल्या तरी कुठला पक्ष किती जागा लढवेल, हे अद्याप अधिकृतरीत्या स्पष्ट झालेलं नाही. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष १०० हून अधिक जागा लढवणार असल्याचे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्टपणे सांगितले आहे त्यावर आता संजय राऊत यांची सूचक प्रतिक्रिया समोर आली आहे.
आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना काँग्रेसकडून १०० जागांवर लढण्यासाठी सुरू असलेल्या तयारीबाबत विचारलं असता संजय राऊत म्हणाले की, काँग्रेसने १०० जागा लढवल्या म्हणून आम्हाला त्रास होण्याचं कारण नाही. जिथे एखादा पक्ष जिंकत असेल, उमेदवार जिंकत असेल तर त्यांनी ती जागा अवश्य लढवली पाहिजे, असं विधान संजय राऊत यांनी केलं. तसेच काँग्रेसच्या खात्यात जाणाऱ्या जागांवर ते उमेदवार जाहीर करत असतील, तर प्रश्न कुठून निर्माण होतो, असेही संजय राऊत म्हणाले.
महाविकास आघाडीमधील जागावाटपाबाबतची चर्चाही संपल्याचंही संजय राऊत यांनी यावेळी सांगितले. महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाबाबतची संपूर्ण चर्चा पूर्ण झाली आहे. आता कुठल्याही जागेसाठी चर्चा होणार नाही. चर्चा संपली, फाईल क्लोल, असे राऊत यांनी सांगितले.
दरम्यान, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार म्हणाले होते की, महाविकास आघाडील सत्तेवर आणण्यासाठी एकेका आमदाराची गरज आहे. या भूमिकेमधून स्वत: राहुल गांधी यांनी लक्ष घातलेलं आहे. आम्ही आता ८७ जागांवरील उमेदवार घोषित केलेले आहेत. तसेच आता आणखी १४ जागा आज संध्याकाळीपर्यंत घोषित होतील.