लोकसभेचे विरोधी पक्षनेते काँग्रेसचेराहुल गांधी यांची जीभ हासडणाऱ्याला ११ लाखांचे बक्षीस जाहीर करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना गाडून टाकण्याची धमकी दिली आहे. तसेच मी वक्तव्य केले, जर मीच माफी मागत नाहीय तर मुख्यमंत्री कशाला मागतील, असे सांगत राहुल गांधींवरील वक्तव्यावर माफी मागणार नसल्याचे गायकवाड यांनी स्पष्ट केले.
आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आम्ही गुन्ह्याची परवा कधी केली नाही. आरक्षणाला विरोध करणाऱ्याला जर धडा शिकवण्याकरता गुन्हा दाखल होत असेल तर आम्हाला काही अडचण नाही. याला जर गुंडगिरी म्हणता असतील तर ही गुंडगिरी मला मान्य आहे, असे गायकवाड म्हणाले.
माझ्या वक्तव्यावर मी ठाम आहे. आरक्षण संपवणाऱ्या बद्दल जे वक्तव्य केले त्यावर ठाम आहे. 70 कोटी लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचे प्लॅनिंग काँग्रेसने केले आहे. काँग्रेस पेक्षा आंदोलने आम्ही केलीत. आम्हाला पण दहा दहा हजार लोक आणून आंदोलन करता येतील. मुख्यमंत्र्याचा कार्यक्रम हा माझा आहे. माझ्या कार्यक्रमामध्ये काँग्रेसच्या कोणी कुत्र्याने घुसण्याचा प्रयत्न केला तर तिथेच गाडून टाकीन, अशी धमकी गायकवाड यांनी दिली आहे.
तुम्ही फक्त रोडवर पाय ठेऊन दाखवा. तुम्हाला समजेल शिवसेना काय आहे. मी खरे बोललो त्याचा जर निषेध करायचा तर करा. जनता तुम्हाला मत पेटीतून उत्तर देईल. जे वक्तव्य केले ते माझे वयक्तिक मत आहे, असेही गायकवाड म्हणाले. तसेच पहिले आपल्या नेत्याला शिकवा, मग निषेध करा असा सल्ला वडेट्टीवारांना दिला.