मुंबई : ‘सोबत राहायचे असेल तर आनंदाने राहा. तुमच्या मागे आम्ही भिकेचे कटोरे घेऊन येणार नाही. तुम्हाला स्वबळाचं फुरफुरं येत असेल तर आज, आता युती तोडण्याची हिंमत दाखवा, असे थेट आव्हान शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिले. शिवाजी पार्कवरील शिवसेनेच्या ५०व्या दसरा मेळाव्यात ते बोलत होते. ‘समोरून वार करणाऱ्या आमच्यासारख्यांवर मागून वार करू नका. यायचं तर सरळ अंगावर या. शिवसेनेचा वाघाचा बच्चा बसलेला आहे. तुम्ही येऊन तर बघा, मग आमचा सर्जिकल स्ट्राइक कसा असतो हे दाखवून देऊ, असे ठाकरे यांनी ठणकावले. शिवसेनेचा गड असलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत स्वबळावर लढण्याचे इशारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाचे काही नेते देऊ लागले आहेत. या पार्श्वभूमीवर, उद्धव यांनी विधानभेत आम्ही गाफील राहिलो. २५ वर्षांचा मित्र अचानक मागून वार करेल असे वाटले नव्हते. गेल्या वेळी झाले ते दरवेळी होणार नाही. आता हा वाघाच्या बच्चा तयार आहे. युतीमध्ये मिठाचा खडा कोण टाकतंय ते मुख्यमंत्र्यांनी ठरवावं आणि अंगावर कोणी यायचं तेही ठरवावं, अशी आपली विनंती असल्याचे ते म्हणाले. रेसकोर्सच्या २०० एकरच्या परिसरात भव्य उद्यान उभारण्याचा कालपर्यंत आग्रह धरणारे उद्धव ठाकरे यांनी आज मात्र त्या ठिकाणी, नव्या-जुन्या पिढीला देशाच्या शौर्याची, सैन्याची माहिती देणारे भव्य ‘वॉर म्युझियम’ उभारण्याची मागणी केली. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, केंद्रीय मंत्री अनंत गिते, शिवसेनेचे सर्व नेते,मंत्री, युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
गैरवापर होत असेल तर अॅट्रॉसिटीत बदल करा अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर होत असल्याचे स्वत: मुख्यमंत्रीही बोलले आहेत. खरेच गैरवापर होऊन कोणावर अन्याय होणार असेल तर बदल केला पाहिजे पण त्या बदलांनी पुन्हा गोरगरीबांवर अन्याय होता कामा नये, अशी भूमिका उद्धव यांनी मांडली. (विशेष प्रतिनिधी)
उद्धव ठाकरे यांच्या भाषणातून... सर्जिकल स्ट्राइक झालेच नाही, इथपर्यंत विधाने करून देशाच्या सैन्याबाबत शंका उपस्थित करणाऱ्यांविरुद्ध देशद्रोहाचे खटले दाखल केले पाहिजेत. अशा माणसांच्या धमन्यांमधून रक्त नाही, तर कराची, लाहोरमधील गटाराचे पाणी वाहते. एकाचवेळी सर्व निवडणुका घेण्याचा कायदा येऊ घातला आहे. तसे खुशाल करा पण मग त्या निवडणुकांत पंतप्रधान, मुख्यमंत्री यांनी विशिष्ट पक्षाचा प्रचार करता कामा नये. प्रचार करायचाच असेल तर त्यांनी अगदी अपक्ष उमेदवारांचाही प्रचार करावा. ‘सामना’मधील व्यंगचित्रावरून मी तमाम माताभगिनींची माफी मागितली. कारण, स्री ही आमच्यासाठी देवीसारखी आहे आणि तिचा अवमान आमच्या घरात होतो अशी यत्किंचितही शंका माताभगिनींना येऊ नये हा माफीचा उद्देश होता.
शिवसेना-भाजपात राडा मुंबई : मुलुंडमध्ये महापालिकेतील भ्रष्टाचाराचा रावण दहन करण्यावरून शिवसेना-भाजपात जोरदार राडा झाल्याची घटना मंगळवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मुलुंड पूर्वेकडील नीलमनगर परिसरातील मैदानात भाजपा खासदार किरीट सोमय्या यांच्या हस्ते महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या रावणाचे दहन करण्यात येणार होते. सायंकाळी तयारी सुरू असतानाच सेनेच्या कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम उधळून लावण्याचा प्रयत्न केला. तेव्हा दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आपापसांत भिडले. ही बाब वरिष्ठांना समजताच सेनेचे शाखाप्रमुख, विभाग अध्यक्ष, उपविभाग अध्यक्षांनी तेथे धाव घेत भाजपाचा कार्यक्रम उधळून लावला. सेनेच्या कार्यकर्त्यांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत हटणार नाही, असा इशारा देत भाजपा कार्यकर्ते रात्री आठेपर्यंत तेथेच होते.
मराठा आरक्षणाला पाठिंबा :
मराठा समाजाला आरक्षण देण्याचे जोरदार समर्थन करून उद्धव ठाकरे म्हणाले की, त्यासाठी शिवसैनिक त्यांच्या खांद्याला खांदा लाऊन मागणी करतील. त्यांच्या आणि आमच्याही हाती भगवाच आहे. मात्र, आर्थिक निकषावर आरक्षण मिळाले पाहिजे, ही शिवसेनाप्रमुखांनी मांडलेली भूमिका २५ वर्षांपूर्वीच मान्य केली असती तर आज हे मोर्चे काढण्याची वेळच आली नसती. मराठा समाजाचे आरक्षण हा त्यांचा न्यायहक्क असून तो देताना ओबीसींसह इतर कोणत्याही आरक्षणाला धक्का लाऊ नये. ‘मी मुख्यमंत्री आहे तोवर मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढेन, असे म्हणू नका. मराठा समाजाला आरक्षण देण्याची धमक दाखवा, असे आवाहन त्यांनी मुख्यमंत्र्यांना केले.