ऑनलाइन लोकमत
शेगाव, दि. 15 - शेतकरी कर्जमुक्त नाही झाला तर राज्यात भूकंप येईल असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. "सरकारने जी कर्जमुक्तीची घोषणा केली आहे त्याची अंमलबाजावणी करण्याची ताकद आणि बुद्धी सरकारला देवो अशी प्रार्थना करतो", असंही उद्धव ठाकरे बोलले आहेत. तसंच कर्जमाफी होत नाही तोपर्यंत मुख्यमंत्र्यांचे मनसुबे पुर्ण होऊ देणार नाही असंही बोलले आहेत. शेगावमधील पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी हे वक्तव्य केलं.
"आपला कृषीप्रधान देश आहे, मात्र शेतक-यांना सर्वात तुच्छतेची वागणूक दिली जाते", अशी खंत यावेळी उद्दव ठाकरेंनी व्यक्त केली आहे. "देशभरात शेतक-यांचा जो उद्रेक दिसतोय ती ठिणगी महाराष्ट्रात पडल्याचा आनंद", असल्याचं उद्धव ठाकरे बोलले आहेत. "साले" म्हणणाऱ्यांना शेतकरी रडवल्याशिवाय राहणार नाही असं म्हणत उद्धव ठाकरेंनी रावसाहेब दानवेंसहित शेतक-यांवर टीका करणा-यांना टोला हाणला आहे. "आंदोलन पेटण्यापूर्वी सरकारने निर्णय घेतला याचा आनंद आहे. सत्तेत असतानाही आम्ही विरोधात उभे राहिलो", असंही उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितलं.
"शेतक-यांनो तुम्ही दुबळे आहोत असं समजू नका, एकजुटीला तडा देऊ नका नाहीतर हाताशी आलेला घास निघून जाईल", असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं. तसंच शिवसेना तसा तो जाऊ देणार नाही असंही ठणकावून सांगितलं. "शेतकरी कर्जमाफी करताना असे निकष ठरवू नका ज्यामुळे शेतक-याला काहीच लाभ मिळणार नाही", असं मत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यावधी निवडणुकांसाठी तयार असल्याचं वक्तव्य केल्याच्या प्रश्नावर बोलताना "मुख्यमंत्र्यांना शेतकरी कर्जाचा विषय बाजूला ठेवायचा असल्याने मध्यावधी निवडणुकांचा विषय काढला असावा", असा टोला हाणला. "एवढा पैसा असेल तर तो शेतक-यांना द्या. कर्जमाफी होत नाही तोपर्यंत तुमचे मनसुबे पुर्ण होऊ देणार नाही", असा इशाराचा मुख्यमंत्र्यांना दिला आहे,