बीड - परतीच्या पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे, अतिवृष्टीमुळे अनेकांच्या शेतजमिनीत पाणी शिरले, पूरामुळे जनावरांचा चारा वाहून गेला, घरं कोसळली, शेतकऱ्यांवर डोंगराएवढं संकट कोसळलं, यात शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झालं. शेतकऱ्यांचे अश्रू पाहण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह मंत्रीमंडळ बांधांवर फिरताना दिसत आहे. मात्र, अद्याप मदतीची घोषणा झालेली नाही. त्यावरुन, खासदार संभाजीराजे भोसले यांनी, काहीही झालं तरी शेतकऱ्यांना मदत मिळालयाच हवी, अशी मागणी केली आहे. कर्ज काढा पण शेतकऱ्यांना मदत करा, असेही संभाजीराजे म्हणाले.
खासदार संभाजीराजे हे आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून तेथील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन संभाजीराजे यांनी पाहणी केली. यावेळी, प्रशासनाचे अधिकारी अद्यापही शेतकऱ्यांच्या शेतात पंचनामे करण्यासाठी पोहोचले नसल्याची खंत संभाजीराजेंनी बोलून दाखवली. जिल्हाधिकारी आणि मुख्याधिकारी यांनी याची दखल घेऊन तात्काळ पंचनामे करणाऱ्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या बांधावर पाठवायला हवं, यासाठी मी जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरुन संवाद साधणार असल्याचंही राजेंनी म्हटलं. तसेच, केंद्र किंवा राज्य असा वाद घालण्याची, राजकारण करण्याची ही वेळ नाही. शेतकऱ्याना तत्काळ मदत जाहीर करायला हवी. शेतकऱ्यांना आज मदत जाहीर न झाल्यास, उद्या त्यांना तोंड दाखवायलाही नेतेमंडळींना जागा राहणार नाही, असेही संभाजी राजेंनी म्हटले. तसेच, हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत सरकारने जाहीर करावी, कर्ज काढा पण मदत जाहीर करा, अशी मागणीही राजे भोसलेंनी केली आहे.
मंत्र्याचे दौरे सुरू, पण घोषणा नाहीच
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह निम्म मंत्रीमंडळ शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करत आहेत. पावसामुळे अनेक भागात पुराची परिस्थिती निर्माण झाली. अनेकांच्या शेतात व घरात पाणी शिरल्याने अतोनात नुकसान झाले. उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोलापूर दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सोलापूरहून थेट अक्कलकोटला पोहचले. सांगवी खुर्द येथील बोरी नदीवरील पुलाची पाहणी करून शेतकऱ्यांची संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विविध संस्था, संघटना, लोकप्रतिनिधी, शेतकऱ्यांची निवेदने स्वीकारली. मात्र, अद्याप कुठलिही मदतीची घोषणा करण्यात आली नाही. त्यावरुन केंद्र आणि राज्य सरकार असं राजकारण दिसतंय.
3,800 रुपयांच्या चेकवरुन शेतकऱ्यांचा संताप
मुख्यमंत्र्यांनी सोमवारी केलेल्या सोलापूरच्या दौऱ्यात काही शेतकऱ्यांना मदतीसाठी धनादेशाचे वाटप करण्यात आले होते. मात्र, सोलापूरच्या रामपूरमध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या हाती केवळ ३ हजार ८०० रुपयांचा चेक दिला आहे. लहान लेकरं उपाशी बसलेत, धान्य वाहून गेले आहे, ३-४ लाखांचे नुकसान झालंय, एवढा तरी चेक कशाला दिलाय? तुमचा चेक घेऊन जा अशा शब्दात शेतकऱ्यांनी संतप्त भावना व्यक्त केली आहे.