पुणे : राष्ट्रीय महामार्ग किंवा द्रुतगती मार्गावरील टोलनाक्यांवर फास्टॅग स्कॅन न झाल्यास वाहनचालकांना पैसे भरावे लागणार नाहीत. केंद्र सरकारच्या अधिसूचनेमध्येच हे स्पष्ट केले आहे. पण केंद्र सरकारसह टोल व्यवस्थापनाकडूनही याबाबत जनजागृती केली नाही. त्यामुळे फास्टॅग असूनही रोखीने पैसे घेतले जात असल्याची चालकांच्या तक्रारी सातत्याने येत आहेत. रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयाने ७ मे २०१८ रोजी काढलेल्या अधिसूचनेमध्ये याबाबत स्पष्ट केले आहे. कोणत्याही वाहनाच्या फास्टॅग खात्यामध्ये पुरेसे पैसे असूनही फास्टॅग स्कॅन झाला नाही तर संबंधितांकडून पैसे घेऊ नये. त्यांना टोलचे पैसे द्यावे लागणार नाहीत, असे त्यामध्ये स्पष्ट केले आहे. पण अद्याप याबाबत वाहनचालकांना माहिती दिलेली नव्हती. फास्टॅग बंधनकारक करण्याबाबत मंत्रालयाकडून नियमांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना टोल व्यवस्थापनाला दिल्या जात असताना या सवलतींबाबत मात्र माहिती दिली जात नव्हती. त्यामुळे टोलनाक्यांवर फास्टॅग स्कॅन न होऊनही वाहनचालकांकडून रोखीने पैसे घेतले जात असल्याचा तक्रारी येत आहेत. रोखीने पैसे घेतल्यानंतर काही वेळा फास्टॅग खात्यातूनही टोलचे पैसे गेल्याचा संदेश वाहनचालकांना येत आहे. याबाबत टोल व्यवस्थापनाकडून मात्र नकार दिला जात आहे. दु्रतगती मार्गावरील टोल व्यवस्थापनाकडून दिलेल्या माहितीनुसार, या मार्गावर काही वर्षांपासून फास्टॅग यंत्रणा कार्यान्वित आहे. त्यामुळे ही यंत्रणा पुरेशी सक्षम आहे. फास्टॅग खात्यात पुरेशी रक्कम नसेल तरच फास्टॅग ब्लॅक लिस्ट दाखविला जातो. त्यामुळे त्यांच्याकडून रोखीने पैसे घ्यावे लागतात. फास्टॅग रीड होत नाही, अशा घटना घडतच नाहीत. त्यामुळे टोल न घेण्याचा प्रश्नच येत नाही. खेड-शिवापूर टोल व्यवस्थपानाकडूनही हेच उत्तर देण्यात आले. मोफत प्रवासाबाबतचा शासन निर्णय केंद्र सरकारने काढावा, अशी मागणी राज्य माल व प्रवासी वाहतूक संघटनेचे बाबा शिंदे यांनी केली आहे. दरम्यान, द्रुतगती मार्गावर फास्टॅगचे कोणतेही बंधन नाही, असे व्यवस्थापनाकडून स्पष्ट करण्यात आले. ..........
दुप्पट टोलवसुली सुरूराष्ट्रीय महामार्गांवरील टोलनाक्यांवर फास्टॅग लेनमधून विना फास्टॅग वाहनांनी प्रवेश केल्यास त्यांच्याकडून दुप्पट टोलवसुली करण्यास सुरुवात झाली आहे. पुणे-सातारा महामार्गावर ही वसुली दोन दिवसांपासून केली जात आहे. त्यामुळे वाहनचालकांना फास्टॅग लेनमधील घुसखोरी महागात पडत आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने १५ जानेवारीपासून फास्टॅगची अंमलबजावणी काटेकोरपणेच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार टोल व्यवस्थापनाकडून टोलवसुली केली आहे. पुणे-सातारा महामार्गावरील खेड-शिवापूर टोलनाक्यावर जाताना नऊ व येताना नऊ लेन आहेत. या लेनपैकी प्रत्येकी दोन लेन फास्टॅग व रोखीने टोल भरणा करण्यासाठी राखीव ठेवल्या आहेत. उर्वरित लेनमधून केवळ फास्टॅग असलेल्या वाहनांनाच प्रवेश आहे. फास्टॅग नसलेल्या वाहनांनी या लेनमधून प्रवेश केल्यास त्यांच्याकडून दुप्पट टोल घेण्याबाबत केंद्र सरकारचीच अधिसूचना आहे. त्यानुसार त्यांच्याकडून दुप्पट टोल वसूल केला जात असल्याची माहिती टोल व्यवस्थापक अमित भाटिया यांनी दिली. द्रुतगतीवर मात्र दुप्पट टोलवसुली केली जात नाही. या मार्गावरील सर्व लेन हायब्रीड आहेत, अशी माहिती टोल व्यवस्थापनाकडून देण्यात आली.