ऑनलाइन लोकमत/ हरिहर गर्जे
पाथर्डी (अहमदनगर), दि. 17 - मुलगी झाल्यास वडिलांची दाढी, कटिंग व बाळसे मोफत तर आईला फलोआहार पुरविण्याचा उपक्रम पाथर्डी शहरातील अविनाश बिडवे यांनी सुरु केला आहे. या उपक्रमाची माहिती लोकांना व्हावी, यासाठी त्यांनी शहरातील सर्व रुग्णालयांमध्ये माहितीफलक लावले आहेत.स्त्री जन्माच्या स्वागतार्थ अनेकविध उपक्रम राबविले जात आहेत. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून पाथर्डी शहरातील शेवगावरोड लगत असलेल्या अवधूत मेन्स पार्लर दुकानाचे मालक अविनाश बिडवे यांनी मुलीचा जन्म झाल्यास संबंधित मातेला फलोआहार, मुलीचे बाळसे कटिंग व मुलीच्या वडिलांची सहा महिन्यांच्या कालावधीसाठी दाढी, कटिंग मोफत करण्याचा उपक्रम सुरु केला आहे. अविनाश बिडवे हे एकनाथवाडी येथील रहिवासी आहेत. परंतु पाथर्डी येथे वडिलोपार्जित केश कर्तनाचा व्यवसाय सांभाळत ते पाथर्डीतच स्थायिक झाले. समाजासाठी आपणही आपलं देणं दिलं पाहिजे, या हेतून त्यांनी स्त्री जन्माच्या स्वागतासाठी हा उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमाच्या जनजागृतीसाठी अविनाश बिडवे यांनी स्टिकर तयार केले असून, ते विविध हॉस्पिटलमध्ये चिकटवले असून मुलगी झाल्यास संपर्क करण्याचे आवाहन केले आहे़ त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.